मुलुंडमध्ये 'डम्पिंग' सुरुच 

मुलुंडमध्ये 'डम्पिंग' सुरुच 

मुंबई : 1 ऑक्‍टोबरपासून मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याचे मुंबई पालिकेने जाहीर केले असले, तरी तेथे कचरा टाकणे सुरूच आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. या डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबवण्यासाठी कंत्राटदाराची तयारी नसल्याने तेथे अजूनही कचरा टाकला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

त्यावर आवश्‍यक तयारी झाली नसताना हे डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याचे जाहीर का केले, असा प्रश्‍न विचारत संबंधित हा प्रकल्प राबवण्यास झालेल्या विलंबाबाबत कंत्राटदाराकडून दंड वसूल करा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. डम्पिंग ग्राऊंड 1 ऑक्‍टोबरपासून बंद झाल्याचे पालिकेने जाहीर केल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. या डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या प्रदूषणाने रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अनेकांना क्षयासारखे श्‍वसनरोगही झाले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर ही घोषणा झाल्याने आता तरी नीट जगता येईल, याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले होते; मात्र तेथे अद्यापही कचरा टाकणे सुरुच असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. 

मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंडवर प्रक्रिया प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने संबंधित कंत्राटदारांची तयारी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कचरा तेथे अजूनही टाकला जातो. कंत्राटदाराने प्रकल्प राबवण्यासाठी आवश्‍यक तयारी केल्यास डम्पिंग ग्राऊंड पूर्णपणे बंद केले जाईल. 
- विश्‍वास शंकरवार, उपायुक्त, घनकचरा विभाग, मुंबई पालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com