तोतया पोलिस अधिकारी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

दिनेश गोगी
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

उल्हासनगर (ठाणे): बेकरीवाल्यांकडून खंडणी मागताना एक तोतया पोलिस अधिकारी उल्हासनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिस खात्याचा सिम्बॉल असलेली त्याची मोटरसायकल जप्त करण्यात आली असून, त्याला 14 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उल्हासनगर (ठाणे): बेकरीवाल्यांकडून खंडणी मागताना एक तोतया पोलिस अधिकारी उल्हासनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिस खात्याचा सिम्बॉल असलेली त्याची मोटरसायकल जप्त करण्यात आली असून, त्याला 14 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

शहाड मध्ये असलेल्या गोल्डन बेकरी मध्ये टिटवाळ्यातील नारायण नगर मध्ये राहणारा भरतकुमार सोनार हा कालरात्री दहा वाजण्याच्या सुमारास गेला. त्याच्या मोटरसायकलवर पोलिस खात्याचा सिम्बॉल असल्याने नोकर साजिद अली शेख घाबरून गेला. सोनारने नोकराकडे बेकरीचे लायसन्स मागितले. बेकरीचे मालक अनिस चौधरी हे बाहेर होते. नोकराने मालकाशी संपर्क साधून पोलिस अधिकारी आल्याचे सांगितले. मालकाने पोलिसाला दोन हजार रुपये द्यायचे सांगून बोलण्यात गुंतवून ठेवण्याच्या सूचना दिल्या. बेकरी मालक चौधरी यांनी पोलिसांना देखील ही माहिती कळवली.

अनिस चौधरी हे बेकरीत आल्यावर सोनारने त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. त्यावर ओळखपत्र दाखवा, असे चौधरी म्हणताच सोनारची बोबळी वळाली. तोपर्यंत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष म्हस्के, हवालदार रविंद्र तायडे, रामचंद्र नाडेकर, सुजित निचिते यांनी बेकरी गाठून भरतकुमार सोनार याला पकडून पोलिस ठाण्यात नेले. त्याच्याकडे क्राईम अँड करप्शन सेंट्रल असोसिएशन ऑफिसर, सेंट्रल क्राईम करप्शन कंट्रोल अँड जस्टीस फेडरेशन नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट यासोबतच मानवाधिकार असे पाच आयडेंडी कार्ड मिळून आले. आयडेंडी कार्ड तसेच मोटरसायकल जप्त करून त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

आज सोनारला न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी आरोपी हा पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून खंडणी मागताना पकडण्यात आला आहे. त्याने आणखी किती ठिकाणी खंडणी उकळली, त्याचे साथीदार कोण आहेत, याचा तपास करण्याचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आल्यावर न्यायालयाने सोनार याला 14 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बनावट ओळखपत्राचा वापर करून खंडणी उकळणारी टोळी असण्याची शक्यता असून, त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांनी दिली.

Web Title: duplicate police office arested at ulhasnagar