लॉकडाऊनच्या काळात गरोदर मातांना मिळाला 'हौसला'; सोशल मिडियातून जपली सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 8 जून 2020

कोरोनाच्या रुग्णांना प्राधान्य देताना अनेक गरोदर मातांकडे दुर्लक्ष होत आहे. या महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने 'हौसला' हा व्हाट्सअप ग्रृप तयार करण्यात आला

 

गेल्या अडिच महिण्यांपासून आपण लॉकडाऊन आहोत. कोरोनापासून वाचण्यासाठी आपण सगळेच स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवत आहोत. परंतु यातून अनेकविध गैरसोयीदेखील होत आहेत. विशेषतः गरोदर मातांच्या बाबतीत होणारी गैरसोय फार मोठी आहे. कोरोनाच्या रुग्णांना प्राधान्य देताना अनेक गरोदर मातांकडे दुर्लक्ष होत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक माता भगिनींना, ज्यांची प्रसूतीची तारीख जवळ आली आहे. परंतु त्यांना वाहतुकीची साधने, रुग्णालये उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी काय करावे हा प्रश्न सतावत आहे. वेळेत दवाखाना उपलब्ध न झाल्याने मुंब्रा येथे एका मातेला आपल्या पोटातील बाळासह जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीमध्ये या माता भगिनींना योग्य मदत योग्य वेळी मिळावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड येथील सरकारी इस्पितळातील  डॉ.राहुल यांना "हौसला" ही संकल्पना सुचली. सोशल मिडियाचा वापर केवळ करमणूक म्हणून होत असताना याच सोशल मिडियाला हाताशी धरुन त्यांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा ठिकाणी हौसलाची संकल्पना राबवली व त्यातून या गरोदर स्त्रियांना 'हौसला' दिला.

सकारात्मक बातमी! कोरोना रुग्णांसाठी स्टीम थेरपी ठरतेय गुणकारी! वाचा बातमी सविस्तर

हौसलाच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 63 गरोदर मातांना हौसलाची मदत झाली आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर गुजरातमध्येही हौसला पोहोचले आहे. यासंदर्भातीय घटना म्हणजे, २० मेच्या रात्री १च्या सुमारास डॉ. राहुल यांच्या दवाखान्यात एक डिलीवरी पेशंट आली. त्या महिलेचे आधी 2 सिझर झाले होते आणि आता सोनोग्राफीमध्ये जुळी मुले दिसत होती. NICU असलेल्या ठिकाणी डिलीवरी होणे गरजेचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना जवळच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. अॅम्ब्युलंसची सोय होत नव्हती. दवाखान्यात कसे पोहचायचे हा प्रश्न होता. म्हणून डॉ. राहुल यांनी हौसलाच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर संपर्क केला. आणि रात्री २ वाजता हौसलाचे सदस्य असलेले राजाभाऊ भालेराव यांनी त्यांच्या घरून डॉ. राहुल यांना फोन केला. डॉक्टरांनी त्यांना आजूबाजूच्या भागात रिक्षाचा शोध घ्यायला सांगितला, पण रिक्षा मिळेना. शेवटी राजाभाऊ स्वतः आपली कार घेऊन निघाले आणि ओळख नसताना त्यांनी त्या पेशंटला वायसीएम रुग्णालयात पोहोचवले. 

राज्यातील धार्मिक स्थळे तूर्तास बंदच; राज्य सरकारची अद्याप परवानगी नाही... 

 गरोदर मातांची प्रसूतीआधी U.S.G.(यूएसजी) चाचणी करावी लागते. तसेच प्रसूती कळा सुरु झाल्यावर त्या महिलेस तिच्या आसपास असणारे रुग्णालय, तसेच डॉक्टर उपलब्ध करुन देण्याचे काम 'हौसला' लॉकडाऊनच्या काळात 24 तास करत आहे. या ग्रुपमध्ये विविध भागातून पोलीस, गृहिणी, डॉक्टर, अधिकारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, कलाक्षेत्रातील लोक जोडले गेले आहेत. हौसलाचे 'ये हौसला' नावाचे फेसबुकपेजही आहे. त्यावरून तु्म्हालाही या सामाजिक उपक्रमात सहभागी होता येईल. डॉ. राहुल इंगळे, डॉ. अजित कृष्णन,  डॉ. नागमणि रेड्डी, अभिजित कांबळे, करण बेटकर, गौतम सुरवाडे, गणेश कांबळे, वैशाली संकपाळ हे तरुण ही संकल्पना महाराष्ट्रभर राबवत आहेत. आणि ज्या ज्या माता भगिनींना हौसलाची गरज आहे त्यांनी या टीमशी संपर्क करण्याचे आवाहन या सर्वांनी केले आहे. यापुढेही हौसलाला मोठ्या स्तरावर घेऊन जात याद्वारे आणखीही मोठे सामाजिक कार्य करायचे आहे.'असे विधान हौसलाचे संस्थापक डॉ. राहुल इंगळे यांनी केले. गरोदर मातांसंदर्भात हौसलाची मदत मिळवण्यासाठी 9356186491, 7715861763, 8104070149 यावर संपर्क साधावा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the lockdown, pregnant mothers received help from 'hosala'