निवडणुकीमुळे शाळांचे निकाल लवकर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

शाळांचे निकाल नियमित वेळेच्या अगोदरच जाहीर करण्यात येणार आहेत. एप्रिलच्या 28 किंवा 29 तारखेला जाहीर होणारे निकाल यंदा 25-26 ला जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीमुळे यंदा शालेय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शाळांचे निकाल नियमित वेळेच्या अगोदरच जाहीर करण्यात येणार आहेत. एप्रिलच्या 28 किंवा 29 तारखेला जाहीर होणारे निकाल यंदा 25-26 ला जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई, ठाणे परिसरात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी शिक्षकांना निवडणुकीचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच शाळांमध्ये मतदान केंद्रे असतात. यासाठी यापूर्वी एक दिवस अगोदर निवडणूक आयोगाकडून शाळा ताब्यात घेण्यात येत होत्या; परंतु यंदा सुमारे 48 तास अगोदर शाळा ताब्यात घेण्यात येणार असल्याच्या तोंडी सूचना मुख्याध्यापकांना मिळाल्या आहेत. त्यामुळे शाळांनी या वर्षांचे निकाल 25, 26 एप्रिल या दिवशी जाहीर करण्याचे ठरवले आहे. परीक्षा संपताच निकाल जाहीर करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाला सहकार्य करण्यासाठी शाळा निकाल लवकर जाहीर करत आहेत. मतदानानंतर निकाल जाहीर करण्यात अनेक अडथळे येतात. त्यामुळे शाळांनी आठवडाभर अगोदर निकाल जाहीर करण्याचे ठरवले असल्याचे, मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले. 

शिक्षकांना सुट्टीची मागणी 
मतदानाच्या एक दिवस अगोदर सर्व शिक्षकांना निवडणूक केंद्रावर हजर राहावे लागते; तर मतदानानंतर मतपेट्या निवडणूक कार्यालयात जमा करेपर्यंत विलंब होतो. त्यामुळे त्यांना रात्री घरी जाण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत हजर राहणे शक्‍य होत नसल्याने मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांना सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली आहे. 

Web Title: Early results of schools due to elections