भूकंपाने तडकल्या भिंती अन्‌ चिरलं काळीज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

तलासरी ः गेले ३९५ दिवस तलासरी, डहाणूतील काही भाग रोज धक्के खात आहे. हे धक्के साधेसुधे नाहीत, भूकंपाचे आहेत. घरात झोपण्याचे धाडस नाही, रस्त्यावर झोपायचे कसे? ३ नोव्हेंबर २०१८ ला सुरू झालेला हा संकटांच्या मालिकेचा प्रवास आजही सुरू आहे. तो कधी थांबेल माहिती नाही. कारण या भूकंपाचे नेमके कारण शोधता येईना आणि त्यामुळे मरणाच्या ढिगाऱ्यावर उभ्या लोकांचे नेमके करायचे काय, याचा निर्णय प्रशासन घेईना, असे दुहेरी संकट आहे.

३ नोव्हेंबर २०१८ ते २ डिसेंबर २०१९ भूकंपाला एक वर्ष २७ दिवस म्हणजे एकूण ३९५ दिवस पूर्ण झालेत. प्रत्येक महिन्यात पूर्ण वर्षभर जिल्ह्यातील धुंदलवाडी गावापासून तलासरी, डहाणू, कासा, वंकास, कवाडा, उधवा, वडवली, आंबोली आदी गावांत भूकंपाच्या धक्‍क्‍यांनी नागरिकांचा जीव संकटात आहे. अगदी सुरवातीला समुद्री लाटेप्रमाणे भूकंप यायचे. त्याची तीव्रता कमी होती. आता घराचा कोपरा न कोपरा हादरू लागला आहे.

माणसे आणि इमारती थरथर कापू लागल्या आहेत. भूगर्भातून गूढ आवाज येऊन संपूर्ण घर हलत असल्याने घरे खिळखिळी झाली आहेत. परिसरातील घरे भूकंपरोधी नसल्याने वारंवार भूकंपाच्या धक्‍क्‍यांनी ४ ते ५ रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला, तर घरे पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळतील, अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे.

पालघर जिल्ह्यात वर्षभरापासून होत असलेल्या भूकंपीय क्रिया या लोकल स्वरूपाच्या कारणांनी असल्याचे अभ्यासावरून दिसत आहे. आमचा अभ्यास सुरूच असून कच्छ, भूजमध्ये होणाऱ्या भूकंपाशी संबंध असा जोडता येऊ शकत नाही; परंतु भूगर्भीय अनेक बाबी आहेत. जलस्तर, भूगर्भीय वायू यामुळे केंद्र बिंदू सारखे बदलल्याचे दिसते. कच्छ, भूजमधील भूगर्भीय प्लेट असल्याने तेथे अधिक क्षमतेचे भूकंप येतात, तर महाराष्ट्रात होणाऱ्या या भूकंपाला आम्ही इंट्रंप्लेट भूकंप म्हणतो.
एन. राणा, भारतीय हवामान विभागतज्ज्ञ, दिल्ली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The earthquake hit the walls and crumbled in Talasari