म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधी यांनीच ठरवायला हवेः शिवसेना

पूजा विचारे | Sunday, 30 August 2020

सध्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरुन वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे. दैनिक 'सामना'तील 'रोखठोक' या सदरामधून भाजपवर हल्ला चढवला आहे.

मुंबईः सध्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरुन वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दैनिक 'सामना'तील 'रोखठोक' या सदरामधून भाजपवर हल्ला चढवला आहे.

रोखठोक सदरात संजय राऊत यांनी काय लिहिलं 

  • काँग्रेसमधील 23 ज्येष्ठांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राने फक्त धुरळा उडाला इतकेच झाले. राजकारणात असे पत्रव्यवहार नेहमीच होत असतात. काँग्रेसला सक्रिय, पूर्णवेळ अध्यक्ष नेमा ही ज्येष्ठांची मागणी योग्यच आहे, पण अध्यक्ष करायचे कोणाला? सक्रिय होण्यास कोणी कोणास थांबवले आहे? राहुल गांधींना रोखायचे ही सक्रियता मात्र काँग्रेसचे अस्तित्वच नष्ट करणारी ठरेल! 
  • देशाच्या राजकारणात सध्या फार काही घडत नाही. तरीही राजकीयदृष्ट्या क्षीण झालेल्या काँग्रेसमध्ये एक वादळ आले आणि गेले. अशा अनेक वादळांतून आणि पडझडीतून काँग्रेस पुन्हा उभी राहिली. आज राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची स्थिती अशी आहे की, वादळ आले तर पडझड होईल इतकीही काँग्रेस कुठे दिसत नाही.
  • आज देश पातळीवर विचार केला तर अनेक राज्यांत काँग्रेस संपलीच आहे. काँग्रेसचा जनाधार रसातळाला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ताकदीने उभे राहील असे नेतृत्व काँग्रेस पक्षात दूरदूरपर्यंत दिसत नाही. 
  • काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी करण्यात चुकीचे काय, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण ही मागणी सहज नव्हती व त्यामागे भाजप पुरस्कृत राजकारण होते, असा आरोप काँग्रेस कार्यकारिणीतच करण्यात आला. राहुल गांधी यांनी कुणाचेही व्यक्तिगत नाव बैठकीत घेतले नाही. पण त्यांनी तळमळीने मुद्दे मांडले.
  • या पत्रांमुळे सोनिया गांधी वैतागून काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतील व आता तुम्हीच काँग्रेस सांभाळा असे सांगतील असा या ‘पत्रलेखक’ नेत्यांचा डाव होता. तो राहुल गांधी यांनी उधळून लावला आहे. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडतील व त्यानंतर सामुदायिक नेतृत्व म्हणून हे ‘पत्रलेखक’ काँग्रेसवर ताबा मिळवतील हे सर्व भाजपला हवेच होते.
  • गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी यावी हा विचार चांगला आहे. पण त्या लायकीची आणि ताकदीची व्यक्ती काँग्रेस पक्षात आज उरली आहे? ज्या 23 काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्यातील एकही नेता काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवू शकेल अशा कुवतीचा नाही. 
  • काँग्रेस पक्ष आज दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाला. त्यास जबाबदार कोणी असले तरी ज्वलंत हिंदुत्वाने बेगडी धर्मनिरपेक्षतेवर केलेली मात हेच त्यामागचे खरे कारण आहे.
  • काँग्रेस पक्ष आजही संपूर्ण देशाला माहीत असलेला व प्रत्येक गावात कार्यकर्ता असलेला पक्ष आहे. ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, शरद पवार, नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव हे सर्व मुख्यमंत्री मूळचे काँग्रेसवाले आहेत व त्या त्या राज्यांतील काँग्रेसचाच जनाधार त्यांनी लुटला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ काँग्रेसचेच अपत्य आहे. 
  •  राज्याराज्यांत काँग्रेस आहे, फक्त मूळ चेहऱ्य़ावरचे मुखवटे बदलले आहेत. या सगळय़ांनी मुखवटे काढून फेकले तरी देशात काँग्रेस एक प्रबळ पक्ष म्हणून उभारी घेईल. तरुण वर्गाला आज काँग्रेसचे आकर्षण का वाटत नाही याचे मंथन सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्य़ा 23 नेत्यांनी करायलाच हवे. 
  • काँग्रेस पक्ष ही कधीही न मरणारी म्हातारी आहे, असे वर्णन एकदा बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी केले होते. म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधींनीच ठरवायला हवे!

Editorial ShivSena mouthpiece Saamana Sanjay Raut on Congress president