सुशिक्षित उमेदवारांनाच निवडून द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

निवडणुकांच्या रणधुमाळीत लोकांचे प्रश्‍न मागे पडतात. त्यामुळे त्यांचे प्रश्‍न व अपेक्षा समजून घेण्याकरिता राजकीय पक्षांचे, उमेदवारांचे लक्ष वेधण्यासाठी ‘सकाळ’ने नागरिकांच्या बैठका घेतल्या. या उपक्रमांतर्गत सर्वसामान्य जनता, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे यांच्याशी संवाद साधला. यातून पुढे आलेला हा अजेंडा मतदारांचा...

मालाड - नागरी सुविधांची पूर्तता करणाऱ्या, त्याची जाण असणाऱ्या सुशिक्षित व स्थानिक उमेदवारांनाच निवडून द्या, असे मत मालाडमधील सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक यांनी मांडले. ‘सकाळ’तर्फे मालाडमधील कुरार व्हिलेज येथे ‘अजेंडा मतदारांचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी झालेल्या चर्चासत्रात नागरी समस्या व त्यावरील उपाय या विषयांवर संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यथा मांडली.

कांदिवली (पू) क्रांतीनगर प्रभाग ३९ मधून आलेल्या रोहित गायकवाड, प्रणाली पाते, संतोष तायडे या नागरिकांनी आपल्या विभागांतील समस्या मांडताना रेल्वेस्थानक ते क्रांतिनगर, डॉ. आंबेडकर चौकपर्यंतची बससेवा, परिसरातील आरोग्य केंद्र व मार्केट रोडच्या जुन्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले. या निवडणुकीत तरी त्याचा विचार होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या चर्चासत्रात प्रभाग ३९ च्या अपक्ष उमेदवार उमा थोरात यासुद्धा उपस्थित होत्या. या प्रभागातील जामरूशीनगर हा वनविभागांतर्गत येत असल्याने येथे कोणत्याही सुविधा नाहीत. मालाड (पू) ३६ व ३७ प्रभागांतून जाणारा रस्ता रुंदीकरण, शिवसागर सोसायटीजवळील शौचालयाची दुरुस्ती, रखडलेल्या एसआरए कामाचे प्रश्न सोडविले न गेल्याने नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकाने ते प्राधान्याने हाती घ्यावेत, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली.

राईट फाऊंडेशनचे विश्वनाथ दामोदर यांनी निवडणुकीसंदर्भात माहिती देणाऱ्या आयोगाच्या २३ आचारसंहितांचे या वेळी सम्यक क्‍लासेसचे अमित पवार यांनी वाचन केले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), उत्तर मुंबई जिल्हा महिला उपाध्यक्षा सुधारणा मिसळे, प्रभाग क्र ३६ चे वॉर्ड अध्यक्ष विकास जाधव, कल्पना बाविस्कर, योगेश बोले, वैशाली जाधव, सुजाता कदम, गोपी बाविस्कर आदींनी विभागांतील समस्या मांडल्या.  समस्यांवर नागरिकांनी उपाय मांडताना नगरसेवक त्याच विभागात राहणारा असावा. तो सुशिक्षित व विभागांतील समस्यांचे ज्ञान व जाण असणारा असावा, अशी भूमिका सर्वांनीच मांडली. या वेळी माता रमाई महिला बचत गट, सम्यक क्‍लासेस, राईट फाऊंडेशन, अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी दल, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र ४२३, मालाड समता संघर्ष समिती या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: educated candidates elected