आणखी आठ जणांना श्‍वानदंश 

दीपक घरत
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

पनवेलमध्ये दुसऱ्या दिवशीही पिसाळलेल्‍या कुत्र्याचा धुमाकूळ 

 पनवेल : रविवारी पनवेल परिसरात भटक्‍या श्वानाने मांडलेला उच्छाद दुसऱ्या दिवशीदेखील सुरूच राहिल्याचे पाहायला मिळाले. रविवारी (ता. २७) शहरात धुमाकूळ घातल्यानंतर पिसाळलेल्या श्वानाने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून मार्गक्रमण करत मार्गात येणाऱ्या गावांमधील आठां जणांचे लचके तोडल्याचे समोर आले. जखमींमध्ये २ वर्षीय आणि ४ वर्षीय बालिकेचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणारे श्वान निर्बीजीकरण केंद्र मागील ४ महिन्यांपासून बंद असल्याने भटक्‍या श्वानांच्या आणि पिसाळलेल्या श्वानांच्या हल्ले करण्याच्या संख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

निविदा प्रक्रियेत देण्यात आलेल्या दरावरून एकवाक्‍यता नसल्याने लांबलेल्या निविदा प्रक्रियेचा फटका निर्बीजीकरण केंद्राला बसला आहे. निर्बीजीकरण बंद असल्याने पालिकेच्या या कारभाराविषयी नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या खरेदीकरिता पनवेल शहरात आलेल्या ग्राहकांना रविवारी शहरात पिसाळलेल्या श्वानाने पसरवलेल्या दहशतीचा सामना करावा लागला. शहरातील तुकाराम महाराजांच्या पुतळ्याजवळून सुरू झालेल्या श्वानाच्या दहशतीचा फटका जवळपास २३ नागरिकांना बसला.

पालिकेमार्फत प्रयत्न केल्यानंतरदेखील पिसाळलेल्या या श्वानाला पकडण्यात आलेल्या अपयशामुळे दुसऱ्या दिवशीदेखील श्वानाची दहशत कायम राहिल्याचे पाहायला मिळाले.  सोमवारी (ता. २८) पिसाळलेल्या श्‍वानाने तालुक्‍यातील पळस्पा फाटा, भिंगारी तसेच नांदगावमधील नागरिकांचे लचके तोडले. यामध्ये नांदगावमधील उज्ज्वला कातकरी या दोन वर्षीय बालिकेवर हल्ला करत तिला जखमी केले. 

श्वानदंशावर देण्यात येणाऱ्या लसींचा साठा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असून, सर्व रुग्णांना लसीचा पुरवठा करण्यात आला आहे.
- प्रमोद पाटील, अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय.

रेबीजची लक्षणे 
रेबीजचा आजार झालेले श्वान साधारणतः आठवडा ते १० दिवस जिवंत राहतात. पाण्याला घाबरणे, पाणी न पिणे, डोळे लाल होणे तसेच चावे घेणे ही रेबीजची लक्षणे आहेत. रेबीजची लागण झालेले श्वान शेवटच्या दोन दिवसात जास्त आक्रमक होऊन जीवन संपवतात. रविवारी आणि सोमवारी दहशत पसरवल्यानंतर सोमवारी सायंकाळपासून दुसऱ्या दिवसापर्यंत श्वानदंश झालेले रुग्ण दाखल न झाल्याने पिसाळलेल्या या श्वानाचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.  रेबीजची लागण झालेले श्वान एक तर एकाच ठिकाणी बसून शांतपणे प्राणत्याग करतात अथवा ४८ तासांत समोर येणाऱ्यांवर हल्ला करतात, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

रुग्णालयात लसींचा पुरेसा साठा 
श्वानदंशावर देण्यात येणाऱ्या लसींचा तुटवडा पनवेल परिसरात काही दिवसांपूर्वी जाणवत होता; मात्र नुकताच पुरेसा साठा उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आल्यानंतरदेखील रुग्णांवर उपचार करणे शक्‍य झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight more dog bites