एकनाथ गायकवाड यांची मुंबईत कार्यकर्ता आभार मोहीम

एकनाथ गायकवाड यांची मुंबईत कार्यकर्ता आभार मोहीम

मुंबई, ता. १ पक्षसंघटना मजबूत करण्याचा एक भाग म्हणून पक्षासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्याची मोहीम मुंबई प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सुरु केली आहे. मुंबईतील सर्व म्हणजे ३६ मतदारसंघात ही मोहीम किमान महिनाभर सुरु राहील.

निवडणुकीत विजयी झाल्यावर मोठ्या नेत्यांचे तसेच मतदारांचे आभार मानले जातात. फारतर नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचेही आभार मानले जातात, कार्यकर्त्यांची एका शब्दात बोळवण केली जाते. कार्यकर्त्यांना चिवड्यातील कढिपत्त्यासारखे वापरून फेकून दिले जाते, असेही वर्णन समाजमाध्यमांवर केले जाते. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ गायकवाड यांनी मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथे कार्यकर्ता मेळावा घेऊन त्यात कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे. 

कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असल्याने त्यांच्या पाठीवर प्रशंसेची थाप मारणे अत्यंत जरुरी आहे. या मोहिमेमुळे कार्यकर्त्यांना कामासाठी प्रोत्साहन मिळेल तसेच नवे कार्यकर्ते पक्षात येतील व ते उत्साहाने कामही करतील. – एकनाथ गायकवाड, कार्याध्यक्ष, मुंबई प्रदेश काँग्रेस.

निवडणुक लढविलेल्या उमेदवारांमार्फत हे मेळावे होतील व त्यात पक्षसंघटना वाढविण्याचा कानमंत्र ज्येष्ठ नेते देतील. काँग्रेसने मुंबईत लढविलेल्या २९ जागांवर हे मेळावे तर घेण्यात येतीलच, पण राष्ट्रवादी काँग्रेसने लढविलेल्या जागांवरही त्या पक्षाच्या सहकार्याने असे आभार मेळावे घेण्याचे नियोजन आहे. या मोहिमेची सुरुवात आजच्या मुलुंड येथील मेळाव्याने झाली. त्यानंतर साधारण महिना-दीड महिना मुंबईभर असे मेळावे घेण्यात येतील. 

जेथे काँग्रेसला विजय मिळाला तेथे उदा. मालाड, मुंबादेवी, धारावी येथे तर आणखी मोठ्या प्रमाणात हे मेळावे होतील. तर अन्य ठिकाणीही निवडणुकीत उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाईल. यामुळे पक्षसंघटना मजबूत तर होईलच, पण पक्षाचे आपल्याकडे लक्ष आहे, हा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये जाईल, असे गायकवाड यांनी सकाळ ला सांगितले. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे देशाला तसेच राज्याला भेडसावणाऱ्या समस्यांवर पक्षातर्फे शहरात लौकरच आंदोलनेही केली जातील, असेही ते म्हणाले. 

WebTitle : eknath gaikwad karyakarta aabhar melawa in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com