Mumbai : शिंदे गट प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरे यांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naresh Mhaske

Mumbai : शिंदे गट प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

डोंबिवली - बांद्र्याचा माणूस बांधावर कधी जातो, बांधावरून बांद्र्याला कधी येतो हे कळत नाही, लक्झरी दौरे आहेत त्यांचे. जेव्हा हाती सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काय केले तुम्ही. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शेकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळाली आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यावर टीका करण्याकरता त्यांचे हे सर्व नाटक सुरू आहे. शेतकरी बळीराजा एवढा दूधखुळा नाही. त्यांना कळतं आपल्यासाठी कोण काम करतात. सातच्या आत ते घरी येतात नंतर त्यांना खूप काम असते अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर शिंदे गटाने गुरुवारी कब्जा केला. त्यानंतर सांयकाळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शाखेला भेट दिली. म्हस्के यांनी नुकतेच आदित्य यांच्यावर एक ट्विट केले आहे. याविषयी ते म्हणाले, शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपयांची रोकड जमा झाली. आपण सातबारा कोरा करण्याच्या मोठ्या गप्पा मारल्या होत्या, केला का सातबारा कोरा.

भूविकास बँकेचे कर्ज माफ केले आणि आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार रुपये देऊ असे सांगितले होते दिले का बांधावर जाऊन. नुकसान भरपाई साठी एनडीआरएफ चे काही नियम आहेत ते नियम आपण शिथिल केले आहेत. शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देऊ केली हे सगळं शिंदे फडणवीस सरकारच्या काळात झाला आहे.

आपण काय शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याकरता नाटक करता. हे फक्त नाटक आहे फडणवीस आणि शिंदे यांच्यावर टीका करण्याकरता हे सर्व सुरू आहे. शेतकरी बळीराजा एवढा दूधखुळा नाही, त्यांना कळतं आपल्यासाठी कोण काम करतात असे ते म्हणाले.

भारतीय चलनी नोटांवर कोणाचे फोटो असावे याविषयी सुरू असलेले राजकारणावर ते म्हणाले, हा विषय देशाच्या पॉलिसी संदर्भातला आहे नोटांचे पॉलिसी तुम्ही, मी किंवा आणखी कोण नाही ठरू शकत. देशातील वरिष्ठ नेते हा निर्णय घेतील या विषयावर आत्ताच्या परिस्थितीमध्ये देशांमध्ये, राज्यांमध्ये वाद घालणं योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे असं बोलत या विषयावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं.

शिवसेना शाखा आज शिंदे गटाने त्याब्यात घेतली याविषयी ते म्हणाले, शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा हा विषय नाही. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू होतं. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शहर प्रमुख राजेश मोरे या शाखेत बसूनच शिवसेनेचे काम पाहत होते.

त्यामुळे ताब्यात घेण्याचा विषय नाही. गेल्या तीन महिन्यापासून आमचे लोक या शाखेत बसून काम पाहतात. जी गोष्ट ताब्यात नसते ती ताब्यात घेतली जाते ही गोष्ट आमचीच आहे. जिल्हाप्रमुख शहरप्रमुख हे सगळे आमचेच. आमच्या ताब्यात आहे ते ताब्यात घेण्याची गरज नाही. रीतसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ही जागा घेतल्याचे नरेश मस्के यांनी यावेळी म्हणाले.