14 गावातील सेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Panchayat samiti Bharat Kalu Bhoir insulted Laxman Patil dombivali mumbai

14 गावातील सेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

डोंबिवली - नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश करण्याविषयीची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी त्यांचा सत्कार सोहळा 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्याविषयीची आढावा बैठक बुधवारी रात्री आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल शिवसेनेचे दहिसर गावातील उप जिल्हाप्रमुख भरत भोईर यांनी फोनवर संपर्क साधत कल्याण पंचायत समिती उपसभापती भरत काळू भोईर तसेच समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांना भरत यांनी शिविगाळ केली. याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैठकीला जाण्यावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये हा वाद झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी पंचायत समिती उपसभापती भोईर हे वरिष्ठांकडे भरत यांची तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे. या वादामुळे 14 गावातील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या हद्दीतील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या 14 गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा याविषयी 14 गाव सर्व पक्षिय विकास समितीच्यावतीने गेले कित्येक वर्षे लढा सुरु होता. नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विकास कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या अधिवेशनात ही 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा केली. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पालक मंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन सर्व पक्षिय विकास समितीच्या वतीने केले जाणार आहे. याच कार्यक्रमाची आढावा बैठक बुधवारी रात्री नारिवली येथे आयोजित केली होती. या बैठकीला सर्व विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, कल्याण पंचायत समिती उपसभापती भरत काळू भोईर, सावळाराम पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपसभापती भोईर यांना शिवसेनेतील दहिसर गावचे उप जिल्हाप्रमुख भरत यांचा फोन आला. त्यांनी नारिवली येथील बैठकीसाठी तू का गेलास याविषयीचा जाब पंचायत समिती भरत यांना विचारला. त्यावर त्यांनी सर्वांसोबत बैठकीला गेलो होतो असे सांगताच त्यांनी लक्ष्मण यांच्या घरी का गेलास असे बोलून त्यांना शिविगाळ केली. दहिसर येथे तू ये तुला बघून घेतो असे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लक्ष्मण पाटील व सावळाराम पाटील यांनाही शिविगाळ करीत दमदाटी केली. यामुळे संतप्त समिती पदाधिकाऱ्यांनी शीळ डायघर पोलिस ठाणे गाठत भरत कृष्णा भोईर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली. परंतू पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. समाज माध्यमावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्याविरोधात मॅसेज व्हायरल होऊ लागले असून पक्षातील वरिष्ठांकडे याविषयी तक्रार करणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणने आहे. भरत भोईर व त्यांच्यासोबत असलेले चार ते पाच पदाधिकारी हे मनमानी करत असून त्यांना वरिष्ठांकडून आळा घातला गेला पाहिजे असे मत स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केले. याला आता उप जिल्हाप्रमुख भोईर काय उत्तर देतात हे पहावे.

विशेष म्हणजे पालकमंत्री शिंदे यांचा सत्कार स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी करणे गरजेचे होते. मात्र याला सेनेतीलच काही पदाधिकारी खोडा घालीत असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. समितीच्या वतीने हा सत्कार होत असल्याने त्याला शिवसेनेतील एका गटाकडून विरोध होत आहे. त्यामुळे सेनेतील अंतर्गत धुसफूस यामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे.

शिवसेना पक्षात विद्यार्थी सेनेपासून आम्ही काम केले असून आज 25 वर्षे पक्षाचे काम करीत आहोत. दहिसरचे उप जिल्हाप्रमुख भरत यांची दादागिरी आम्ही का सहन करायची. यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. वरिष्ठांकडे याविषयी तक्रार केली असून त्यांच्या वागण्याविषयी देखील माहिती देणार आहोत. आम्हाला यांचे वागणे पटत नसून त्यांच्यामुळेच गावात शिवसेना पक्ष कमी झाला आहे.

- भरत काळू भोईर, कल्याण पंचायत समिती उपसभापती

नारीवली येथे समितीचे कार्यकर्ते व नागरिक नियोजन बैठकीसाठी आलो होतो. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत भोईर व नागावचे भरत भोईर यांना फोन करुन धमकी दिली की समितीच्या बैठकीला का गेलास. त्यानंतर त्यांनी मला व नारिवलीचे माजी उपसरपंच पाटील यांना शिविगाळ केली. समिती फोडण्याचे तसेच समाजाला विखुरण्याचे काम त्यांचे पूर्वीपासून सुरु आहे. सेनेत राहून सेनेचा बट्याबोळ करण्याचे काम भरत करत आहेत.

- लक्ष्मण पाटील, 14 गाव सर्व पक्षिय विकास समिती

Web Title: Eknath Shinde Panchayat Samiti Bharat Kalu Bhoir Insulted Laxman Patil Dombivali Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top