Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी दिली झोपडपट्टीला भेट ; अधिकारी-कंत्राटदारांना दिली तंबी ! | Eknath Shinde visited the slum in kurla scolds Officer-contractors | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी दिली झोपडपट्टीला भेट ; अधिकारी-कंत्राटदारांना दिली तंबी !

Eknath Shinde - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुर्ला परिसरातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला अचानक भेट दिल्याने पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांची धांदल उडाली.

वसाहतीतील शौचालय आणि परिसराच्या पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत दिवसातून पाच वेळा स्वच्छता करण्याचे आदेश त्यांना दिले. पालिका आयुक्तांना महिनाभराचा वेळ देत वसाहतीतील स्वच्छता आणि डागडुजी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ गिरगाव चौपाटीवर आज राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अचानक कुर्ला परिसरातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली आणि तेथील शौचालय व परिसराच्या साफसफाईची पाहणी केली.

महापालिका अधिकाऱ्यांना यापूर्वीच निर्देश देऊनही दिवसातून पाच वेळा साफसफाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना चांगलेच फैलावर घेतले. या वेळी आमदार मंगेश कुडाळकर, पालिका आयुक्त आय. एस. चहल इत्यादींसह अधिकारी उपस्थित होते.

अधिकारी-कंत्राटदारांना तंबी

- स्थानिकांना तातडीने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दररोज पाच वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी, अशी तंबी एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना दिली.

- पालिकेच्या खर्चाने स्वच्छतागृहाची दुरुस्ती आणि डागडुजी करावी. तसे न केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावावी. कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना केल्या.