एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी वृद्धांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्याकरिता एसटीने स्मार्ट कार्डची योजना सुरू केली. मात्र, ही कार्डवाटप सुविधा सध्या बऱ्याच धीम्या गतीने सुरू असल्याने ज्येष्ठ नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत.

मुंबई ः प्रवासात सवलत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची योजना एसटी प्रशासनामार्फत राबवली जात आहे. मात्र हे कार्ड मिळवण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकावर वृद्ध लाभार्थींना बराच वेळ रांगेत तिष्ठत उभे राहावे  लागत आहे. तसेच दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत कार्ड वाटपाची वेळ असून, वेळेपूर्वीच खिडकी बंद होत असल्याने, अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. त्यामुळे कार्ड मिळवण्यासाठी वृद्धांचे हाल होत आहेत. 

ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्याकरिता एसटीने स्मार्ट कार्डची योजना सुरू केली. याकरिता काही महिन्यांपूर्वीच मुंबई सेंट्रल स्थानकावर नोंददेखील करण्यात आली होती. त्यानंतर प्रवास सवलतधारकांना स्मार्ट कार्डचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, ही कार्डवाटप सुविधा सध्या बऱ्याच धीम्या गतीने सुरू असल्याने ज्येष्ठ नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. तसेच वेळेआधीच कार्डवाटप बंद करण्यात येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान, या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांना विचारले असता  इंटरनेटचा वेग धीमा असल्याने एक कार्ड देण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पाच वाजेपर्यंत वितरित करता येतील एवढेच अर्ज स्वीकारत असल्याचे एसटीचे अधिकारी महादेव मस्के यांनी सांगितले. 

स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी दिवसभर रांगेत उभा आहे. मात्र, सुरुवातीला आलेल्या नागरिकांचाच अर्ज स्वीकारण्यात आला आहे. वेळ संपली असे सांगून उद्या येण्याचे एसटीचे अधिकारी सांगतात.
- शंकर बालाजी अभंग, काळाचौकी, एसटी प्रवासी

कांदिवलीवरून स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी ३ वाजण्याआधीच आले आहे. मात्र कोणत्याही सूचना न देता स्मार्ट कार्ड देणे बंद केले. आहे.
- कलावती शहा, कांदिवली, एसटी प्रवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elder persons facing difficulty to get ST smart cards