वृद्ध दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मार्च 2019

नवी मुंबई : कारच्या भाड्याचे पैसे न देता शिवीगाळ आणि दमदाटी केल्याच्या मानसिक तणावातून एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उलवा येथे शनिवारी उजेडात आली. यात वृद्ध पतीचा मृत्यू झाला असून वृद्धेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दीपक चव्हाण या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

नवी मुंबई : कारच्या भाड्याचे पैसे न देता शिवीगाळ आणि दमदाटी केल्याच्या मानसिक तणावातून एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उलवा येथे शनिवारी उजेडात आली. यात वृद्ध पतीचा मृत्यू झाला असून वृद्धेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दीपक चव्हाण या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेतील मृत दिगंबर चव्हाण यांचा मुलगा क्षमिक चव्हाण याने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी एक कार घेतली होती. महिन्याभरापूर्वी त्याने ओएलएक्‍सच्या माध्यमातून ओळख झालेल्या दीपक चव्हाण या व्यक्तीला आपली कार दरदिवशी 1500 रुपयेप्रमाणे 25 दिवसांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिली होती. 25 दिवस पूर्ण झाल्यानंतर क्षमिक चव्हाण याने दीपक चव्हाण याला कारच्या भाड्यासाठी फोन केला असता, आरोपी दीपक चव्हाण याने 5-6 दिवसांत भाडे व कार परत देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे क्षमिक याने काही दिवसांनंतर पुन्हा त्याला फोन केल्यानंतर त्याने त्याची कार परत देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे क्षमिकने आपल्या वडिलांसह तळोजा येथे प्रत्यक्ष जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांना सापडला नाही.

त्यानंतर दिगंबर चव्हाण यांनी दीपक चव्हाण याला फोनवरून संपर्क साधला असता, त्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या कारचे पैसे देण्यास तसेच त्यांची कार परत देण्यास टाळाटाळ केली. तसेच त्याने दिगंबर चव्हाण यांना शिवीगाळ करून त्यांना दमदाटी केली. त्यामुळे दिगंबर चव्हाण हे मानसिक तणावाखाली आले होते. त्यामुळे त्यांनी रविवारी (ता. 3) घरामध्ये कुणीही नसताना, पत्नी सुषमा चव्हाण यांच्यासह कीटकनाशक प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

क्षमिक याने या दोघांना नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याठिकाणी या दोघांवर उपचार सुरू असताना त्यातील दिगंबर चव्हाण यांचा गुरुवारी (ता. 7) मृत्यू झाला. 

आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीवरून घटनेचा तपास

या घटनेतील मृत दिगंबर चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यात त्यांनी दीपक चव्हाण याने कारचे 65 हजार रुपये भाडे न दिल्याने, तसेच त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याने आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी दीपक चव्हाण याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elderly couple suicide attempt one died