न्यायालयात निवडणूक आयोगाचे प्रतिज्ञापत्र सादर, वसई-विरार निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा

प्रसाद जोशी
Thursday, 29 October 2020

वसई विरार शहर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना, भौगोलिक रचना, मतदार संख्येतील फरक तसेच हरकती, सूचना फेटाळून लावल्याने कॉंग्रेसचे सचिव समीर वर्तक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

वसई : निवडणूक आयोग जोपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करीत नाही तोपर्यंत वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानुसार गुरुवारी निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पुरेशी माहिती न दिल्याने याचिकाकर्ते दाद मागण्यासाठी महापालिकेविरोधात पुन्हा नव्याने याचिका दाखल करणार आहेत. 

नक्की वाचा : मुंबई पालिकेला 34 कोटींचा दंड, राष्ट्रीय हरीत लवादाचे निर्देश

वसई विरार शहर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना, भौगोलिक रचना, मतदार संख्येतील फरक तसेच हरकती, सूचना फेटाळून लावल्याने कॉंग्रेसचे सचिव समीर वर्तक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबतची सुनावणी (ता. 29) न्यायालयाने घेतली. यावेळी निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर केले. अंतिम अधिसूचना प्रसिद्धी केली असून निवडणुकीची मतदार यादी बनविणे व निवडणुका जाहीर करणे या टप्प्यास सुरुवात करीत असल्याने समीर वर्तक यांची याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने यावेळी, समीर वर्तक यांनी दाखल केलेली याचिका प्रारूप अधिसूचनेवर घेतली होती. आता अंतिम अधिसूचना जाहीर झाल्याने खटला रद्द करण्याचे अधोरेखित केले आहे. 

महत्त्वाची बातमी : रहिवाशांना दिलासा, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खातं उघडणे बंधनकारक

समीर वर्तक यांच्या वकिलांनी यावेळी बाजू मांडताना, पालिकेने व निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करताना 23 सप्टेंबर रोजी अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे असे सांगून त्याची प्रत सादर केली. परंतु समीर वर्तक यांना 7 ऑक्‍टोबर 2020 रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीत प्रारूप अधिसूचना देण्यात आली. मात्र, त्यावेळी अंतिम अधिसूचना प्रसिद्धी केल्याचे कळविले नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रारूप अधिसूचना संदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करेपर्यंत अंतिम अधिसूचना संदर्भात काहीही माहिती नसल्याने सदर याचिका रद्द न करता प्रारूप अधिसूचना विरोधात दाखल खटल्यातून बाहेर पडू देण्याची विनंती न्यायालयास करण्यात आली. वसई विरार शहर महापालिका निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच निवडणुकीचे वारे वाहण्याची शक्‍यता आहे असे एकंदरीत दिसून येत आहे. 

हे ही वाचा : 50 टक्के शिक्षकांना तात्काळ कामावर रूजू होण्याचे आदेश, अध्यादेश गोंधळाचा असल्याचा मुख्याध्यापकांचा आरोप

नव्याने अंतिम अधिसूचना विरोधात माहिती न मिळाल्याने यापूर्वी हरकती घेतलेल्या व्यक्तिसहित वसई विरार महापालिका विरोधात नव्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. 
- समीर वर्तक, याचिकाकर्ते. 

(संपादन : वैभव गाटे)

Election Commission submits affidavit to court about vasai virar election


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission submits affidavit to court about vasai virar election