निवडणूक खर्चाची स्वस्ताई

दीपक शेलार- सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

निवडणुकीदरम्यान कुठल्याही वस्तूंसाठी समितीने खर्चाचे दर ठरवून दिले आहेत...

ठाणे - निवडणुकांसाठी पालिकेने उमेदवारांसाठी जाहीर केलेले निवडणूक खर्चाचे दरपत्रक म्हणजे वाढत्या महागाईत स्वस्ताई असली, तरी दरपत्रकातील अनेक बाबींचे आकलन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय प्रचारफलक आणि कार्यालयाच्या परवानगीसाठी खासगी जागामालक आणि जाहिरात एजन्सीकडे रक्कम भरली तरीही पालिका जिझिया वसुली करत असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून होत आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राजकीय पक्षांच्या मान्यतेने हे दर निश्‍चित केले आहेत.

निवडणूक आयोगाला पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रति उमेदवार आठ लाख खर्च करण्याची मर्यादा ठरवून दिली आहे. राजकीय पक्षांकडून जो खर्च होईल, तो पक्षाच्या अधिकृत उमेदवारांमध्ये विभागला जाणार आहे. कोणत्या कामासाठी किंवा वस्तूसाठी किती खर्च येतो, हे ठरवणारे दरपत्रक पालिकेने प्रसिद्ध केले आहे. या दरपत्रकातील दर बाजारभावापेक्षा कमी आहेत. साध्या हॅंडबिल छपाईसाठी ५० पैसे प्रति पान, व्होटर स्लीप ३० पैसे, बॅनर व होर्डिंग पाच ते १०० रुपये प्रति चौरस फूट, पक्षाचा झेंडा पाच ते ९० रुपये प्रति नग, गांधी टोपी व साधी टोपी पाच रुपये, फुलांचा बुके ३० ते १५० रुपये आहेत. उमेदवारांच्या प्रचारात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पोटाला आधार असणारा वडापाव या दरपत्रकातून गायब आहे. खानपान यादीतील वस्तूंमधील चहा सहा रुपये, शाकाहारी जेवण ७० आणि मांसाहारी भोजन १०० रुपये आणि मटण-चिकन बिर्याणीसाठी अवघे ८० रुपये दर ठरवून दिले आहेत. याशिवाय, प्रचारासाठी लागणाऱ्या कार-मोटारी आदींसह इतर वाहनांचे प्रति किलो मीटर दरसुद्धा माफक आहेत. दुचाकीसाठी तीन रुपये, कूल कॅब १२.६० रुपये, इनोव्हा-तवेरा १२.३५ पैसे, बस २४ रुपये असे आहेत. नेत्यांच्या स्वागतासाठी लागणाऱ्या फटाक्‍यांचे दर बाजारभावापेक्षा कमीच आहेत. ३० रुपये सुतळी बॉम्बचा बॉक्‍स; तर हजारची माळ फक्त १३० रुपयांना आहे. प्रचार कार्यालयातील प्रचारक, प्रतिनिधी, मतदार प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधींना किमान वेतनानुसार प्रति दिन ४२३ रुपये भत्ता ठरवून दिला आहे.

हायटेक पालिकेला ग्लोबल सभांचा विसर   

लाऊडस्पीकर्सचे प्रति सेट प्रतिदिन भाडे साडेचार हजार रुपये दर्शवले आहे; मात्र लाऊडस्पीकर आणि भोंग्याची पद्धत आता वापरात नसून सभास्थानी फाइंग साऊंड बसवले जातात. त्याशिवाय काही निवडणुकांमध्ये प्रचारासाठी एलईडी स्क्रीनचा सर्रास वापर होत आहे. तसेच सभांच्या भव्य व्यासपीठांच्या खर्चाचा उल्लेख दरपत्रकात नाही.

Web Title: Election expenses cheapness