पहारेकरी पालिकेतील सत्तेत  सहभागी होणार काय?

पहारेकरी पालिकेतील सत्तेत  सहभागी होणार काय?

मुंबई - मुंबई महापालिकेच्या २०१९-२० या वर्षांसाठीच्या वैधानिक आणि विशेष समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होणार असून, समित्यात मोठे बदल होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पालिकेत पहारेकरी राहिलेला आणि आता शिवसेनेसोबत लोकसभा निवडणुकीत युती केलेला भाजप पालिकेतील सत्तेत सहभागी होणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांसाठी ३ एप्रिलला निवडणूक होत असून, १ एप्रिलला अर्ज भरता येणार आहेत. स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समितीच्या (उपनगरे) अध्यक्ष पदासाठी ४ एप्रिलला निवडणूक होणार आहे. त्यासाठी २ एप्रिलला अर्ज भरता येणार आहेत. तर सार्वजनिक आरोग्य, बाजार व उद्यान समिती, विधी समिती, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पदासाठी ५ एप्रिलला निवडणूक असून, २ एप्रिलला अर्ज दाखल केले जाणार आहे. महापालिकेच्या विविध १६ प्रभाग समित्यांची निवडणूक ७, ९ आणि १२ एप्रिलला होणार असून, त्यासाठी ४ एप्रिलला अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भाजप पालिकेतील सत्तेत सहभागी होईल काय, याबाबत भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना विचारले असता, त्यांनी याबाबत उद्या निर्णय घेऊ, असे सांगितले. 

स्थायी समिती जाधवांकडेच?
महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर गतवर्षी यशवंत जाधव यांची वर्णी लागली. कोस्टल रोड, अंधेरी लिंक रोड, मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव, असे महत्त्वाचे प्रस्ताव विरोधकांना सोबत घेत त्यांनी मंजूर केले. जाधव यांची कामकाज करण्याची हातोटी लक्षात घेता पक्षाकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

सुधार समितीसाठी रस्सीखेच
सुधार समितीच्या अध्यक्षपदी मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेत आणणारे दिलीप लांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. लांडे यांच्या कारकिर्दीत गेल्या वर्षभरात जोगेश्वरी, कुर्ला, काजूपाडा, तसेच इतर काही भूखंड प्रकरणे गाजली. आगामी विधानसभा निवडणुकीत लांडे यांना कुर्ला- चांदिवलीमधून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांच्या जागी रमाकांत रहाटे, राजू पेडणेकर किंवा किशोरी पेडणेकर यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. 

असा असणार निवडणूक कार्यक्रम
३ एप्रिल - स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक 
४ एप्रिल - स्थापत्य (शहर) आणि स्थापत्य (उपनगर) समिती निवडणूक
४ एप्रिल - बाजार व उद्यान, विधी, आरोग्य, महिला व बाल विकास समितीची निवडणूक
८, ९ आणि १२ एप्रिल - १७  प्रभाग समितींच्या निवडणुका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com