सिंध महाराष्ट्रीय समाज संस्थेची निवडणूक, 15 तारखेला 

दिनेश गोगी
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

उल्हासनगर - देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून निर्वासित म्हणून उल्हासनगरात आलेल्या मराठी मालवणी, बौद्ध, गुजराती, परिट समाजाने स्थापन केलेल्या सिंध महाराष्ट्रीय समाज संस्थेची निवडणूक 15 ऑगस्ट रोजी होत आहे. त्यात तीन पॅनल रिंगणात असून आजी-माजी नगरसेवक यांचा अध्यक्ष पदासाठी आमना-सामना होणार आहे. त्यामुळे निवडणुक उत्कंठावर्धक होणार आहे.

पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्या मराठी मालवणी, बौद्ध, गुजराती, परिट या बांधवांनी एकत्र येऊन उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मराठा सेक्शन भागात 1948 मध्ये सिंध महाराष्ट्रीय समाज संस्थेची स्थापना केली. 1955मध्ये संस्थेची कायदेशीर नोंदणी झाली. उल्हास विद्यालय ही शाळा बांधली. उल्हासनगरात पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात देखील याच संस्थेने केली.

या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशान्वये होत आहे. संस्थेचे 170 सदस्य असून 15 ऑगस्ट रोजी ते मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी विद्यमान शिवसेना नगरसेवक सुरेंद्र सावंत यांचे विद्या प्रबोधन पॅनल, शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांचे उत्कर्ष पॅनल व शिवसेनेचेच माजी नगरसेवक सुभाष मनसुलकर यांचे उल्हास विकास पॅनल या आजी-माजी नगरसेवकांचा विजयासाठीच्या जुगलबंदीचा आमना-सामना होणार आहे. प्रत्येक जण विजयाचा दावा करत आहेत. 15 ऑगस्ट रोजी मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी व निकाल असल्याने कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याकडे संपूर्ण मराठा सेक्शन परिसराचे लक्ष लागले आहे.

Web Title: Election of Sindh Maharashtrian Society, on 15th