इलेक्‍ट्रिक बसचा एसटी महामंडळाला शॉक!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

एसटी प्रवाशांना लवकरच वातानुकूलित विजेवरील बस (इलेक्‍ट्रिक) मधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, त्यामुळे बस फेऱ्या कमी होण्याची शक्‍यता आहे... 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना लवकरच वातानुकूलित विजेवरील बस (इलेक्‍ट्रिक) मधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे; मात्र त्यामुळे बस फेऱ्या कमी होण्याची शक्‍यता आहे. कारण इलेक्‍ट्रिक बस ४०० किमी धावू शकते. त्यानंतर तिला पुन्हा दोन तास चार्जिंग करावे लागणार आहे. विजेवरील बस प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-पुणे मार्गावर धावणार असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १०० बस येणार आहेत.

विजेवरील  बसमुळे एसटीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. एसटीला प्रत्येक बस गाड्यांच्या इंधनाच्या प्रतिकिलोमीटरमागे १ रुपये २० पैसे खर्च येत आहे. इलेक्‍ट्रिकवरील प्रत्येक बसमागे ६४ पैसे प्रति किमी खर्च येतो. त्यामुळे कमी होणारा खर्च पाहता विजेवरील बस चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. 

सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी ३ तास २० मिनिटांचा कालावधी लागत असून शिवनेरीच्या एका बसच्या मुंबई-पुणे मार्गावर चार फेऱ्या होतात; मात्र विजेवरील बसगाड्या जास्तीत जास्त ४०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. मुंबई-पुणे मार्गावर एक फेरी पूर्ण केल्यानंतर अशा बसला पुन्हा दोन तास चार्जिंग करावे लागणार आहे. त्यामुळे त्या गाड्या प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-पुणे मार्गावर चालवण्यात येणार असून इलेक्‍ट्रिक बसच्या फेऱ्या कमी होणार आहेत. ज्या कंपन्या इलेक्‍ट्रिक बसपुरवठा करतील त्यांच्याकडूनच त्यासाठी लागणारी चार्जिंगची सुविधा पुरवली जाणार आहे. २५० किलोमीटरपर्यंतच्या अंतरापर्यंत धावू शकतील अशा बस घेण्यात येतील.

ऑगस्टअखेर १०० गाड्या
राज्यातील एसटीच्या प्रवाशांचा प्रवास सुकर, पर्यावरणपूरक करण्यासोबतच खर्च आटोक्‍यात आणण्यासाठी विजेवरील बस चालवण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला आहे. त्यानुसार १०० बस ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. एका बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असून त्याबाबतची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे मार्गच का?
एसटी महामंडळासमोर ग्रामीण भागांतील विजेचा प्रश्‍न पाहता तेथे चार्जिंग स्टेशन बसवण्याची समस्या आहे. त्यामुळे प्रथम लांब पल्ल्याच्या मार्गावर इलेक्‍ट्रिक बस चालवण्याऐवजी मुंबई ते पुणे अशा कमी अंतरावर बस चालवण्याचा प्रयत्न महामंडळाकडून केला जाणार आहे.

       ई-बसचे फायदे

  1. इंधन खर्च कमी होणार
  2. वातानुकूलित बसमुळे प्रवाशांचा सुसह्य प्रवास
  3. प्रदूषणविरहित
  4. देखभाल-दुरुस्तीचा खर्च कमी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric bus frequency may be less likely due to timely charging