मुंबई लोकलचा आज वाढदिवस! वाचा काही खास गोष्टी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

विजेवर धावणाऱ्या (इलेक्‍ट्रिक) लोकलला आज 95 वर्षे पूर्ण झाली.

मुंबई : विजेवर धावणाऱ्या (इलेक्‍ट्रिक) लोकलला आज 95 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर विशेष कार्यक्रम झाला. फलाट क्रमांक 1 वर रेल्वेचे निवृत्त कर्मचारी वीणाधरन पी. टी. यांनी केक कापून "ईएमयू'चा (इलेक्‍ट्रिकल मल्टिपल युनिट) वाढदिवस साजरा केला आणि सजवलेल्या लोकलला हिरवा झेंडा दाखवला. 

हेही वाचा - नवी मुंबईत निवडणूकीपूर्वी लिंबू-मिर्चीचा खेळ चाले...

भारतातील वीजप्रवाहावर धावणाऱ्या रेल्वेला सोमवारी 95 वर्षे पूर्ण झाली. पहिली इलेक्‍ट्रिक लोकल 3 फेब्रुवारी 1925 रोजी व्हिक्‍टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला स्थानकापर्यंत चालवण्यात आली होती. त्या घटनेची आठवण म्हणून मध्य रेल्वेने सोमवारी 1500 व्होल्ट विजेवर धावणारी लोकल चालवली. रेल्वेचे निवृत्त कर्मचारी वीणाधरन पी. टी. यांनी हिरवा झेंडा दाखवून ही सजवलेली लोकल सीएसएमटीमधून रवाना केली. फेब्रुवारी 1925 नंतर नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवर लोकल धावू लागल्या. इलेक्‍ट्रिक इंजिन बनवले गेले आणि लांब पल्ल्याच्या गाड्याही विजेवर धावू लागल्या. 

महत्त्वाची बातमी - शिवसेनेने ठरवले तर भाजपला मुंबईत फिरणे अशक्य!

फक्त चार डबे! 

ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीने 3 फेब्रुवारी 1925 रोजी विजेवर धावणारी पहिली लोकल मुंबईत सुरू केली. फक्त चार डबे जोडलेल्या या गाडीचा वेग ताशी 50 किलोमीटर होता. या लोकलचे डबे मुख्यत: लाकडी बनावटीचे होते आणि काही प्रमाणात लोखंडाचा वापर करण्यात आला होता. 

वीजगाडीचा प्रवास 

1925 : हार्बर मार्गावर 4 डबे 
1927 : मुख्य व हार्बर मार्गावर 8 डबे 
1961 : मुख्य मार्गावर 9 डबे 
1986 : मुख्य मार्गावर 12 डबे 
1987 : कर्जतकडे 12 डबे 
2008 : कसाऱ्याकडे 12 डबे 
2010 : ट्रान्स हार्बर मार्गावर 12 डबे 
2012 : मुख्य मार्गावर 15 डबे 
2016 : हार्बर मार्गावर 12 डबे 
2020 : ट्रान्स हार्बरवर वातानुकूलित 

 

web title : Electric Local's 95th Birthday Today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric Local's 95th Birthday Today