
वाशी/तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : ऐरोली विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे घणसोली विभागातील सेक्टर २४, गोठीवली येथील चार मुले विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १२) घडली.
वाशी/तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : ऐरोली विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे घणसोली विभागातील सेक्टर २४, गोठीवली येथील चार मुले विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १२) घडली. जखमींपैकी हेमांग चंद्रकांत (८) याचा चेहरा जळाला असून त्याच्यावर नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर परी बिपीन सिंग (७) या मुलीचा हात जळाला असून तीच्यावर मोदी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर सोमन्या पाटील (८) व तनिशा चव्हाण (८)या दोघी किरकोळ जखमी झाल्या असून उपचारानंतर त्यांना घरी सोडले आहे.
घणसोली सेक्टर २३ येथील माऊली हाईट्स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अगदी जवळून अतिउच्च दाबाच्या उघड्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन याबाबत सोसायटीतर्फे अनेकदा लेखी अर्ज विद्युत विभागाकडे सादर करण्यात आले होते. मात्र, विद्युत विभागाच्या निष्काळजीणामुळे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता चार लहान मुलांना अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा जोराचा झटका बसला.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव
महावितरणच्या अधिकाऱ्यांना येथील रहिवाशांनी उच्च दाबाची विद्युत वाहिनी हटिवण्यासाठी पत्रव्यवहारदेखील केला होता. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला होता. मंगळवारी चार मुलांना या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागण्याचा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील रहिवाशांनी संताप व्यक्त करत बुधवारी (ता. १३) ऐरोली सेक्टर १५ येथील महावितरणच्या कार्यालयावर विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह धडक देत येथील महावितरणचे कार्यकारी अंभियता अनंत जाधव यांना धारेवर धरले. रहिवाशांच्या संतापामुळे येथील अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी करत येत्या दोन दिवसांत येथील उच्च दाबाची विद्युत वाहिनी हटवण्यात येईल असे स्पष्ट केले.
नागरिकांची निदर्शने
या धोकादायक वीज वाहिन्यांबाबत सोसायटीने यापूर्वी विद्युत विभाग अधिकाऱ्यांना मागील दोन वर्षांपासून लेखी तक्रार दिली होती. परंतु, विद्युत विभागाच्या बेजबाबदारपणामुळे चार मुलांचा अपघात झाला. या घटनेमुळे माऊली सोसायटीतील रहिवाशांनी बुधवारी (ता. १३) ऐरोली येथील विद्युत कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. जर विद्युत विभागाने लवकरात लवकर कारवाई करून सदर उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या हटविल्या नाहीत; तर या पुढे मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा येथील रहिवासी तथा शिवसेनेचे ऐरोली उत्तर नवी मुंबईचे उपविभागप्रमुख महेश गांजाळे यांनी या वेळी दिला आहे.