Mumbai News : वीज मीटर काढल्यानंतरही वीजेची चोरी; 101 जणांविरुद्ध गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity theft even after removing electricity meter Cases filed against 101 people Titwala mumbai crime

Mumbai News : वीज मीटर काढल्यानंतरही वीजेची चोरी; 101 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

डोंबिवली : थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करुन, वीज मीटर काढल्यानंतरही वीज चोरी होत असल्याची बाब उघड झाली आहे. महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील अशा पद्धतीने वीज चोरी करणाऱ्या 101 जणांविरोधात मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महावितरणच्या पथकाने टिटवाळा, गोवेली व खडवली परिसरात धडक कारवाई करून 33 लाख 78 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणलेल्या ग्राहकांचा यात समावेश आहे. थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी करण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत.

त्यानुसार कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा उपविभागात तपासणी मोहिम राबवण्यात आली. टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत मौर्या नगर, वैष्णवी चाळ, रेणुका नगर चाळ, जयशंकर चाळ, जाधवनगर चाळ, गोवेली रोड, टिटवाळा व बल्याणी परिसरात 16 ग्राहकांकडे 5 लाख 39 हजार रुपयांची वीजचोरी आढळली.

गोवेली शाखा कार्यालयांतर्गत बेलकर पाडा, आदिवासी वाडी, मुम्हसरुंडी, मामनोली, कुंदे, रायते, भिसोळ, नालिंबी, घोटसर, म्हारळ, वरप, नवगाव, कोलम परिसरात 70 ग्राहकांकडे सुरू असलेली 14 लाख 29 हजार रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. तर खडवली शाखा कार्यालयांतर्गत फळेगाव भागात 15 ग्राहकांकडे 14 लाख 10 हजार रुपयांची वीजचोरी आढळली.

थकबाकी पोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. तर अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व त्यांना वीज पुरविणारा अशा दोघांविरुद्धही फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येते. टिटवाळ्याचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते धनंजय पाटील, निलेश महाजन व कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.