उल्हासनगरातील शासकीय रूग्णालयाच्या लिफ्टमध्ये रूग्ण व कर्मचारी अडकला

दिनेश गोगी
गुरुवार, 21 जून 2018

लिफ्टमधून रूग्णालयातील कर्मचारी व रूग्ण खाली उतरत असताना अचानक तीही बंद पडल्याने लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

उल्हासनगर - शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाच्या दुसऱ्या माळयावर जाण्यासाठी 2 लिफ्ट असून त्यापैकी 1 लिफ्ट बंद पडली असतानाच बुधवारी सकाळी दुसऱ्या लिफ्टमधून रूग्णालयातील कर्मचारी व रूग्ण खाली उतरत असताना अचानक तीही बंद पडल्याने लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. रूग्णालयाच्या दोन्ही लिफट बंद पडल्यामुळे रूग्णांचे विशेषत: वयोवृध्द रूग्णांना मोठयाप्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

शहरातील कॅम्प नं. 3 येथील शासकीय मध्यवर्ती रूग्णालय असून या रूग्णालयात मोठयाप्रमाणात उपचारासाठी रूग्ण येत असतात. रूग्णालयाच्या दुसऱ्या माळयावर जाण्यासाठी एकुण दोन लिफ्ट असून एक लिफ्ट बऱ्याच दिवसांपासून नादुस्थ अवस्थेत आहे तर दुसरी लिफ्ट अधुनमधुन बंद पडत असून त्या लिफ्ट मधून जाताना रूग्ण घाबरतात. गरोदर महिला दुसऱ्या माळयावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करीत असल्याने ती बंद पडल्यामुळे या महिलांना दुसऱ्या माळयावर जिने चढुनच जावे लागते. याशिवाय रूग्णांना दुसऱ्या मजल्यावरून खाली आणताना मोठयाप्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते. एक लिफट बंद असताना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास रूग्णालयातील कर्मचारी रोहिदास व त्याच्यासोबत एक रूग्ण दुसऱ्या माळयावरून खाली उतरत होते. अचानक तीही बंद झाल्यामुळे ते दोघेही त्या लिफ्टमध्ये अडकले. वेळीच कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेऊन लिफटमध्ये अडकलेल्या त्या दोघांची सुखरूपपणे सुटका केली. दोन्ही लिफट बंद असल्यामुळे रूग्णांचे मोठयाप्रमाणात हाल होत असून जिने चढुनच रूग्णांना दुसऱ्या माळयावर जावे लागते. बंद अवस्थेत असलेल्या दोन्ही लिफ्टची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख नासिर खान यांनी केली आहे.

यासंदर्भात रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, लिफ्ट सुरू करण्यासाठी कल्याणच्या सार्वजनिक विभागाच्या तांत्रिक व इलेक्ट्रॉनिक अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. येत्या दोन तीन दिवसात दोन्ही लिफ्ट सुरू करण्यात येतील असे सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In the elevation of the government hospital in Ulhasanagar the patient and the staff were stuck