उल्हासनगरात 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या

दिनेश गोगी
मंगळवार, 17 जुलै 2018

अवघ्या 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची भाजीच्या कापण्याच्या सुरीने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

उल्हासनगर - विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अवघ्या 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खोलीत भाजीच्या कापण्याच्या सुरीने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उल्हासनगरात घडली आहे.

याप्रकरणी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) मोहन खंडारे यांनी दिली.
हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव हर्ष गणेश आल्हाट आहे. तो विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माणेरा गावात आई वडिलांसोबत राहत होता. त्याचे आईवडील हे हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जय जनता कॉलनी भागात जीन्सच्या कारखान्यात काम करतात. काल सायंकाळी गणेश व त्याची पत्नी कामावरून घरी गेल्यावर त्यांना हर्ष दिसला नाही. त्यांनी शोधाशोध केली. पण हर्षचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी जय जनता कॉलनी गाठली. कारण बऱ्याचदा घरी एकटा राहण्यापेक्षा हर्षला ते सोबत कामाच्या ठिकाणी नेत होते. तिथे झाकीर हुसेन अन्सारी यांच्या खोलीत भाड्याने राहणाऱ्या कामगारांच्या घरात हर्ष खेळायला जात होता.

गणेश आणि त्याची पत्नी जय जनता कॉलनी येथे गेले असता,त्यांना त्या घरात हर्षचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसला. त्याचा गळा भाजी कापण्याच्या सुरीने निर्दयपणे चिरण्यात आला होता. याप्रकरणी गणेशने दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञातांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्याम पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जय जनता कॉलनी मधील खोलीत भाड्याने राहणाऱ्यांपैकी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मोहन खंडारे यांनी सांगितले. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Eleven year old boy kidnapped and murdered in Ulhasanagar mumbai