राज्य सरकारच्या प्रयोगामुळे अकरावी प्रवेश लांबणार? 

राज्य सरकारच्या प्रयोगामुळे अकरावी प्रवेश लांबणार? 

मुंबई - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने दिली असली तरी, राज्य मंडळ आणि सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी निकाल लागल्यानंतर राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रयोगांमुळे प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्‍यता आहे. 

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाकडून अद्याप राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर कोणताही विचार झाला नसल्याने प्रवेश प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत. तसेच पुढील वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जावेत का, याविषयी तज्ज्ञांची समिती नियुक्‍त केली जाणार असून, ही समिती याविषयीचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. 

अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणाप्रमाणे सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे लेखी गुण ग्राह्य धरण्याबाबत राज्य सरकारच्या वतीने सीबीएसई आणि आयसीएसई या मंडळांशी चर्चा सुरू आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी राज्यमंडळ, सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळाचे गुण समान पातळीवर आणण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी अकरावीच्या प्रवेशासंदर्भात काही सूचना दिल्या असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असे तावडे म्हणाले. महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या जागा वाढविण्यासंदर्भात संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि व्यवस्थापन यांच्यासमवेत चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात संबंधित महाविद्यालयाने अधिक जागांसाठी अनुकूलता दर्शविल्यास त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. या प्रवेश प्रक्रियेला विलंब केला जाणार नाही. 
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com