अकरावीची यंदाची संचमान्यता स्थगित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

शिक्षक संख्या जास्त ठरू नये म्हणून इयत्ता ११ वी करिता केवळ या वर्षी संचमान्यता स्थगित करून मागील वर्षीच्या विद्यार्थिसंख्येनुसार अनुज्ञेय असलेला शिक्षक संच देण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई - शिक्षक संख्या जास्त ठरू नये म्हणून इयत्ता ११ वी करिता केवळ या वर्षी संचमान्यता स्थगित करून मागील वर्षीच्या विद्यार्थिसंख्येनुसार अनुज्ञेय असलेला शिक्षक संच देण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दर वर्षी शिक्षण विभागातर्फे संचमान्यता करण्यात येते, त्यानुसार या वर्षी ११ वीची संचमान्यता करावी लागणार होती. या वर्षी दहावीचा निकाल पाहता संचमान्यता केल्यास शिक्षक संख्या अतिरिक्त ठरेल, अशी भीती मुंबई ज्युनिअर कॉलेज टीचर युनियन या  शिक्षक संघटनेने व्यक्त केली होती. तसेच शिक्षक आमदारांनीही याकडे शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, आज शालेय शिक्षणमंत्री ॲड आशिष शेलार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन केवळ एका वर्षाकरिता संचमान्यता करण्यास स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गतवर्षीच्या विद्यार्थिसंख्येचा विचार करून अनुज्ञय असलेला शिक्षक संच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Set recognition Stop Ashish Shelar