
आजही आसपास मोठा आवाज आला तर असं वाटतं की बॉम्बवर्षाव सुरु आहे.. ही प्रतिक्रिया आहे युक्रेनमधील खारकीव्हवरुन परतलेल्या भाईंदरच्या साई मोहन रापोल याची.
‘दुतावासानं सांगितलं स्वत:च्या जबाबदारीवर हंगेरी सीमेपर्यंत या’; भाईंदरच्या तरुणाची व्यथा
- प्रकाश लिमये
भाईंदर - आजही आसपास मोठा आवाज आला तर असं वाटतं की बॉम्बवर्षाव (Bombrain) सुरु आहे.. ही प्रतिक्रिया आहे युक्रेनमधील (Ukraine) खारकीव्हवरुन परतलेल्या भाईंदरच्या साई मोहन रापोल (Sai Rapol) याची. बॉम्बफेक, गोळीबाराच्या फैरी या युद्धाच्या (War) परिस्थितीत बंकरमध्ये तब्बल चार दिवस काढल्यानंतर जीव मुठीत धरुन साई कसाबसा हंगेरीला (Hungary) पोहोचला आणि तेथून विमानाने भारतात (India) दाखल झाला. युक्रेनमधील भारतीय दुतावासाचा फोन लागला नाही. तर हंगेरीतील भारतीय दुतावासानं स्वत:च्या जबाबदारीवर हंगेरीच्या सीमेपर्यंत या, असं उत्तर दिल्याचं साईनं भारतात परतल्यानंतर सांगितलं.
युक्रेनच्या खारकीव्हमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या साईने युद्ध म्हणजे काय असते याचा अगदी जवळून अनुभव घेतला. त्यचे चार वर्षांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. खारकीव्हवर रशिया हल्ला करणार याची जाणीव होताच साई आणि त्याच्या मित्रांनी 24 फेब्रुवारीला इमारतीखालीच असलेल्या बंकरमध्ये आश्रय घेतला. त्याच्यासारखेच आणखी काही भारतीय विद्यार्थी आणि युक्रेनचे नागरिक बंकरमध्ये होते. केवळ एक दिवस त्यांना संधी मिळताच इमारतीत असलेल्या घरात जाऊन अन्न शिजवून आणता आले. मात्र परिस्थिती बिघडल्यानंतर तेही शक्य झाले नाही. आसपास सतत बॉम्ब आणि गोळीबाराचे आवाज येत असत. त्यामुळे बाहेर पडायलाही त्यांना भीती वाटायची. अशावेळी सोबत असलेली चॉकलेट, बिस्कीटे खाऊन दिवस काढावे लागत होते. एक दिवस तर तेही संपले. प्यायला पाणी देखील नव्हते. बंकरमध्ये इंटरनेट मिळत नसल्यामुळे घरच्यांशीही संपर्क होत नसे. आपले आता काय होणार याची काहीच माहिती मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी बंकरमधून बाहेर पडायचे आणि युक्रेनची सीमा गाठायचे निश्चित केले.
सर्वप्रथम त्यांनी कीव्ह येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याठिकाणचा फोन सतत बिझी येऊ लागला. मग हंगेरीमधील दूतावासाचा फोन शोधून काढून त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी खारकीव्ह मध्ये येणे शक्य नसल्याने स्वत:च्या जबाबदारीवर हंगेरीच्या सीमेपर्यंत येण्यास सांगितले. त्यामुळे काय करायचे असा प्रश्न साई आणि त्याच्या मित्रांसमोर होता. त्यांच्यापुढे हंगेरीसह पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाकीया असे पर्याय होते. अखेर सर्वांनी हंगेरीला जायचे ठरवले. 28 फेब्रुवारीला बंकरमधून जीव मुठीत धरुन ते बाहेर पडले आणी खारकीव्ह रेल्वे स्थानक गाठले. रस्त्यात ठिकठिकाणी सैनिक, लष्करी गाड्या, रणगाडे असे भायवह चित्र होते. सतत बॉम्ब पडण्याचे आवाजही येत होते. एखादा बॉम्ब आपल्यावरही येऊन पडेल अशी प्रचंड धास्ती त्यांना वातत होती. मात्र सर्व धैर्य एकवटून ते रेल्वे स्थानकात पोहोचले.
हेही वाचा: सीमेच्या पलीकडे गेल्यानंतर नरकातून स्वर्गात आल्यासारखे वाटले; ऐश्वर्या राठोड
त्याठिकाणी देखील आधी युक्रेनच्या नागरिकांना प्राधान्य दिले जात होते. सहा ते सात तास रांगेत थांबून अखेर एलव्हीवला जाणारी ट्रेन त्यांनी पकडली. मात्र बाराशे किलोमीटरच्या या प्रवासात तब्बल दोन दिवस पोटात अन्नाचा कणही नाही आणि पाणीही नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून बाहेर पडायचे या इछाबळावर त्यांनी एलव्हीव्ह गाठले. काही विद्यार्थी चक्कर येऊनही पडत होते. एलव्हीव्हला मात्र युक्रेनच्या नागरिकांनी मोठी मदत केली. सर्वांची खाणायापिण्याची चांगली व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली. एलव्हीव्ह मधून त्यांनी एका बसने मग युक्रेन सीमा गाठली. त्याठिकाणीही सीमेबाहेर पडण्यासाठी संघर्ष सुरु होता. अखेर सर्व सोपस्कार पार पाडून त्यांनी हंगेरीत प्रवेश केला आणि त्यांच्या जीवात जीव आला. मात्र त्याठिकाणीही बॉम्बचे आवाज ऐकू येत होते. पुढची सर्व व्यवस्था भारतीय दूतावासाने केली असल्यामुळे भारतात येणे सोपे झाले. शुक्रवारी पहाटे साई मुंबईत दाखल झाला.
विमानतळावर आई वडिलांना बघितले आणि आपण सुखरुप आलो याची खात्री पटली. जीव वाचला हीच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. मात्र आजही एखाद्या मोठ्या आवाजाने दचकायला होते. युक्रेनमधील त्या भयावह आठवणीतून बाहेर पडण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे साई सांगतो.
Web Title: Embassy Said Come Hungary Border At Your Own Risk Sai Rapol Talking
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..