अवकाळी पावसाने नवी मुंबईकरांची तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

शुक्रवारी अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे नवी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली होती. ऐरोली, रबाळे, सानपाडा, घणसोली येथील भुयारी मार्गांत पाणी साचले होते; तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनांची गती कमी होऊन ठाणे-बेलापूर मार्ग, सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

नवी मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या महाचक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असल्यामुळे हवामानात बदल होत आहे. त्यातच शुक्रवारी (ता. ८) शहरात सकाळच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या या पावसाच्या सरींमुळे नवी मुंबईकरांची मात्र त्रेधातिरपीट उडाली होती. नवी मुंबईतील ऐरोली, रबाळे, सानपाडा, घणसोली येथील भुयारी मार्गांत पाणी साचले होते; तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनांची गती कमी होऊन ठाणे-बेलापूर मार्ग, सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

नवी मुंबईत गुरुवारी संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते; तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या भागात जोरदार सरी कोसळल्याने ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे येथील भुयारी मार्गांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सकाळच्या सत्रात सुरू असणाऱ्या पावसाने १० वाजल्यानंतर विश्रांती घेतली. अवकाळी पावसामुळे महापालिकेकडून आपत्कालीन परिस्थितीत बसवण्यात आलेले पंप, ऑक्‍टोबर महिन्यात काढून टाकण्यात आल्याने रबाले टी जंक्‍शनजवळ पाणी साचले होते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. रबाळेपासून घणसोलीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडीमुळे रांगा लागल्या असल्याने वाहनचालकांनी शॉर्टकट मारण्यासाठी गोठिवली येथून अंतर्गत रस्त्यावरून जाण्याचा पर्याय निवडला होता; मात्र वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रबाळेच्या अंतर्गत रस्त्यांवरदेखील वाहतूक कोंडी झाली होती. नोसिल नाक्‍यावरदेखील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती.

ऐरोली सेक्‍टर तीनजवळील भुयारी मार्गातदेखील पाणी साचले होते. मुकंद कपंनीच्या सर्कलजवळील पाणी जाण्यास जागा नसल्याने त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. विटावा येथील भुयारी मार्गात खाली साचलेल्या पाण्यामुळे मुकंद कपंनीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या; तर दिघाकडून ऐरोलीकडे येण्यासाठी रिक्षाचालकदेखील तयार नसल्यामुळे सकाळच्या वेळी कामासाठी निघणाऱ्या कामगारांचे हाल झाले; तर वाहनचालकांनादेखील यांचा फटका सहन करावा लागत होता. एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याच्या अंतर्गत रस्त्याचेदेखील काम सुर असल्याने तिथेदेखील वाहतूककोंडी झाली होती. ठाणे-बेलापूर मार्गावरी महापे येथील भुयारी मार्गाखालीदेखील पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले होते.

मुकंद कपंनीपासून ऐरोली सेक्‍टर पाचपर्यंत जाण्यासाठी रिक्षांच्या प्रतीक्षेत होते; मात्र २० मिनिटे होऊनही रिक्षा आली नाही. त्यानंतर रिक्षा मिळाली; मात्र ऐरोली सेक्‍टर तीनपर्यंतच रिक्षाने सोडले. त्यातच भारत बिजली सर्कलजवळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे १५ मिनिटांच्या प्रवासासाठी ४५ मिनिटे गेली.
- स्नेहल रोडे, प्रवासी.

पावसामुळे रबाळे टी जंक्‍शनजवळ पाणी साचल्याने वाहनांची गती कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच वाहनचालकांनी शॉर्टकट मारण्यासाठी नोसील नाकामार्गे येण्याचा पर्याय निवडल्यामुळे अंतर्गत रस्त्यावरदेखील कोंडी झाली होती. पालिकेला वाहतूक कोंडी झाल्याची माहिती दिल्यांनतर रबाळे टी जंक्‍शनजवळ पंप बसवण्यात येऊन पाणी काढण्यात आले.
- पी. ए. औटी, पोलिस निरीक्षक, रबाळे (वाहतूक).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: embroil of new Mumbai residents in the unseasonal rains