आपत्कालीन ब्लॉकमुळे मध्य रेल्वे विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

मध्य रेल्वेवरील माटुंगा आणि दादर स्थानकांदरम्यान शनिवारी (ता. ३०) १० मिनिटांचा आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही दिशांकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला.

मुंबई : मध्य रेल्वेवरील माटुंगा आणि दादर स्थानकांदरम्यान शनिवारी (ता. ३०) १० मिनिटांचा आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही दिशांकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला. तब्बल १२ फेऱ्यांना विलंब झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या  अधिकाऱ्यांनी दिली.  

मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकाजवळ गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळी ११.०५ वाजता सीएसएमटी दिशेकडील धीम्या मार्गावरील रुळ कमकुवत असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती तत्काळ आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकल १० मिनिटे थांबवण्यात येत होत्या. आपत्कालीन ब्लॉक घेऊन हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. 

धीम्या मार्गावरील लोकलचा वेग माटुंगा स्थानकानजीक कमी करण्यात आला होता. त्यामुळे लोकलची रांग लागली आणि वेळापत्रक कोलमडले. परिणामी १२ लोकल फेऱ्यांना विलंब झाला. या बिघाडाबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. या बिघाडामुळे दुपारी ३.३० वाजेपर्यंत लोकल उशिराने धावत होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emergency block disrupts central train