महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा कुचकामी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

ऐरोली नॉलेज पार्क परिसरातील पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा रविवारी बुडून मृत्यू झाला; मात्र, ३६ तासांनंतर पालिकेच्या अग्निशमन दल व आपत्कालीन पथकाला या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले. या शोधमोहिमेत पालिकेकडे मदत साहित्य नसल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

मुंबई : पावसाळ्यात कोणतीही स्थिती उद्भवल्यास, आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचा नवी मुंबई महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. ऐरोली नॉलेज पार्क परिसरातील पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा रविवारी (ता.४) बुडून मृत्यू झाला; मात्र, ३६ तासांनंतर पालिकेच्या अग्निशमन दल व आपत्कालीन पथकाला या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले. या शोधमोहिमेत पालिकेकडे मदत साहित्य नसल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

ऐरोली नॉलेज पार्क रस्त्यावरील नेव्हा पार्कच्या आवारात जुने पाण्याचे डबके आहे. रविवारी मुसळधार पाऊस असतानाही कळवा पूर्वेतील सात तरुण या डबक्‍यात पोहण्यासाठी उतरले होते. यात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आणि गाळ असल्याने मनीष तारे हा १९ वर्षीय तरुण पाण्यात बुडाला. ऐरोलीतील समाजसेवक राजा धनावडे यांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिस व अग्शिनशमक दलाला दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने रविवारी रात्री दोन तास शोधमोहीम हाती घेतली; मात्र तरुणाच्या मृतदेहाचा शोध न लागल्याचे ही मोहीम थांबविण्यात आली. 

सोमवारी सकाळी अग्निशमन दलाचे पथक तब्बल १० वाजता नागरिकांनी संपर्क साधल्यावर दाखल झाले. त्यानंतर दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास बोट घेऊन अग्निशमक दलाचे पथक तैनात झाले. त्यांनी पाण्यात बांबू आणि दोराच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडे पोहणारे स्वीमर नव्हते, तर पाण्यात उतरून शोध घेणारे स्कुबा पथकही पालिकेकडे उपलब्ध नसल्याची बाब समोर आली. या संदर्भात तारे कुटुंबीयांनी मागणी करूनही विशेष पथक महापालिकेकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आले नाही. 

३६ तासांनंतर सापडला मृतदेह 
३६ तासांपर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात पालिकेच्या पथकाला अपयश आले. अखेर मंगळवारी (ता.६) रात्री २ वाजण्याच्या सुमारास तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगू लागल्याने त्याला सकाळी बाहेर काढत नवी मुंबई पालिकेच्या रुग्णालयात शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले.

ऐरोली नॉलेज पार्क परिसरात असणारे पाण्याचे डबके खोल असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. त्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता; तर पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे एकच गोताशु (सुक्‍बा ड्राईव्ह) असून, ते बंद अवस्थेत आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे मदत मागितली असता त्यांचे पथक हे महापूर आलेल्या ठिकाणी शोधकार्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले.
- जगदीश पाटील, अग्निशमन केंद्र अधिकारी, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emergency system of the municipal corporation is Ineffective