तुर्भेत कचऱ्याचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

तुर्भेतील नवी मुंबई महापालिकेचे सार्वजनिक शौचालय व तलावाशेजारील मोकळी जागा सध्या कचऱ्याचे मोठे आगार बनले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून, गावातील नागरिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई : तुर्भेतील नवी मुंबई महापालिकेचे सार्वजनिक शौचालय व तलावाशेजारील मोकळी जागा सध्या कचऱ्याचे मोठे आगार बनले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून, गावातील नागरिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तुर्भे सेक्‍टर- २२ येथील शितलादेवी मंदिराच्या मागे भूखंड क्र.१२८ जवळ महापालिकेचे सार्वजनिक शौचालय असून, या शौचालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंगी अशा आजारांचा फैलाव वाढण्याची शक्‍यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे. या सार्वजनिक शौचालयासमोरील जागा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी व्यापल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, या ठिकाणी मिनी डम्पिंग तयार झाले आहे. याबाबत स्थानिक नागिकांकडून वारंवार प्रशासनाकडे तक्रारीदेखील करण्यात आल्या. मात्र, या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्‍याचा ठरण्याची शक्‍यता आहे. या ठिकाणी वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने तो कुजून परिसरात दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कचराकुंडी ओव्हर फ्लो झाल्याने कचऱ्याचा ढिगारा रस्त्यात जमा झाल्याने उंदीर, घुशी व भटक्‍या कुत्र्यांची दहशत वाढू लागली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने त्वरित कचरा उचलावा, अशी मागणी ग्रामस्थ मंडळाकडून तुर्भे विभाग कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

तुर्भे गावाला सध्या कचऱ्याचा विळखा पडला असून, किमान सणासुदीला तरी कचऱ्याची विल्हेवाट लावावी, याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.
- शरद पाटील, ग्रामस्थ, तुर्भे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Empire of waste in Turbhe