
Mumbai News : कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुंबईच्या डबेवाल्याना फटका!
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून शासकीय कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे शासकीय कार्यालयातील कामे, रुग्णालयीन सेवा सर्वकाही ठप्प झाली आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात डब्बा पोहोचवणारा डब्बेवालाही या संपामुळे अडचणीत सापडला आहे.
कर्मचारी कामावर जात नसल्यामुळे डब्बांची संख्या ५० टक्काने कमी झाली आहे. आधीच कोविड काळात ग्राहकांची संख्या घटली आहे. त्यामुळे आता आमच्या पोटावर पाय देवू नका, वाटाघाटीतून या संपावर मार्ग काढा अशी आर्त हाक मुंबई डब्बेवाला संघटनेनं राज्य सरकारकडे केली आहे.
दिवसाला २ लाखाचे नूकसान
मुंबईत डब्बेवाले दररोज ९० हजार जेवणाचे डब्बे कार्यालयात पोहोचवतात. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या टिफीनची संख्या 18000 एवढी आहे. मात्र संप सुरु झाल्यापासून टिफीनची संख्या 7000 पर्यंत खाली आहे. कर्मचारी कार्यालयात नसल्यामुळे त्यांनी टिफीन मागवणे बंद केले आहे.
याचा फटका डब्बेवाल्यांना पडत आहे. एक डब्बा पोहोचून देण्यासाठी साधारण प्रति दिवस ३० रुपये डब्बेवाले आकारतात. त्यामुळे या संपामुळे दिवसाला २ लाख १० हजार रुपयाचे आर्थिक नुकसान डबेवाल्यांना होत आहे. त्यामुळे या संपातून लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी काढण्याची मागणी डब्बेवाल्यांची आहे.
कोविड संसर्गात आमच्या व्यवसायाची आर्थिक घडी पुर्णपणे विस्कटली. कोविड संपला, कसे बसे तग धरतोय, तेच संप, या संपामुळे आमचे नूकसान होत आहे. आधीच आमच्या न्याय हक्काच्या मागण्यावर सरकार काहीच निर्णय घेत नाही. त्यामुळे जनतेच्या आणि आम्हा डब्बेवाल्यांच्या भल्यासाठी लवकरात लवकर या संपावर तोडगा निघावा.
- विष्णू काळडोके, मुंबई डबेवाला संघटना