रोजगाराच्या नव्या वाटांची दिशा...

रोजगाराच्या नव्या वाटांची दिशा...

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर संगणकावर आधारित सेवांचे महत्त्व आगामी कालावधीत वाढणार आहे. विशेषतः ‘प्रोग्रामिंग’ला सेवा क्षेत्रात अधिक महत्त्व मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. याच उद्देशाने राज्य सरकारच्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीने डीटीपी आणि प्रोग्रामिंग यांसारख्या प्रशिक्षणासाठी प्राधान्य दिले आहे. राज्यातील एकूण १६९८ व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर्स (व्हीटीपी)च्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ‘आयटी’ क्षेत्रात या उपक्रमाच्या माध्यमातून ७० टक्के जणांना रोजगाराची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

कुशल विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांची सांगड घालण्याच्या उद्दिष्टाने राज्यात ‘करिअर गायडन्स सेंटर’ची सुरुवात अमरावतीपासून झाली आहे. यापुढच्या काळात मुंबई, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, पुणे यांसारख्या ठिकाणीही अशा सेंटरची स्थापना करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीने ठेवले आहे. मॅन्युफॅक्‍चरिंग आणि आयटीच्या निमित्ताने मुंबई-पुणे कॉरिडॉर हाही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रासाठी राज्य सरकारनेही धोरणे तयार केली असल्याचे यातून स्पष्ट होते.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना मुख्यालयाच्या उद्दिष्टाने मुंबईचे आकर्षण नेहमीच राहिले आहे; पण मुंबई शहरातील जागेचे वाढते दर आणि भाड्याचे पैसे यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी आपले प्रस्थ उपनगर व एमएमआर क्षेत्रात विकसित करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यात अनेक बड्या कंपन्यांपासून नव्याने उदयास येणाऱ्या ‘स्टार्ट अप’ कंपन्याही आहेत. कॉर्पोरेट ऑफिसपासून डाटा सेंटरसाठी आता मुंबई उपनगरापाठोपाठ नवी मुंबईचे आकर्षण होऊ लागले आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळाच्या उद्दिष्टाने आता ‘सॉफ्ट स्किल’सारख्या अभ्यासक्रमात ‘हायब्रिड’ संकल्पनांचा समावेश होऊ लागला आहे.

कर्मचाऱ्यांवर होणारा पगाराचा खर्च, कार्यालयासाठी जागेचे भाडे आणि वीजबिल हा आयटी कंपन्यांच्या गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुंबईत वाढलेला खर्च पाहता एमएमआर क्षेत्रात अनेक कंपन्यांनी आपला बस्ता मांडला आहे. अनेक कंपन्यांचे डाटा सेंटरही नवी मुंबईत आहेत. अनेक नावाजलेल्या कंपन्याही आगामी दिवसात मुंबई महानगर प्रदेशात आपली कार्यालये उभारण्याकरता प्रयत्नशील आहेत. मुंबईत कार्यालय असलेल्या नावाजलेल्या कंपन्यांकडून कौशल्य विकासाच्या दृष्टीनेही अनेक कंपन्यांनी राज्य सरकारसोबत प्रयत्न सुरू केले आहेत. सिसको, एचपी यांसारख्या कंपन्यांनी हार्डवेअरच्या निमित्ताने कुशल मनुष्यबळ तयार करण्याकरता पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारसोबत या कंपन्यांनी तसे सामंजस्य करारही केले आहेत. 

वाढत्या ॲप्लिकेशनवर आधारित सेवा आणि गॅजेटचा वापर पाहता सायबर सुरक्षेसाठीही राज्य सरकारने ‘व्हिजन’ ठेवले आहे, हे महत्त्वाचे आहे. सायबर सुरक्षेसाठी मोठे पथक राज्य सरकारच्या पातळीवर उभारण्याचे उद्दिष्ट आहे. बहुतांश क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव पाहता शालेय अभ्यासक्रमातही सायबर सुरक्षेचे धडे देण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने ‘क्विक हिल फाऊंडेशन’च्या मदतीने सायबर सुरक्षा गाईडही तयार केले आहे. ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्ज, क्‍लाऊड कॉम्प्युटिंग, ड्रोन, ड्रायव्हरलेस कार यांसारखे तंत्रज्ञान भारतातही आपले वेगळेपण सिद्ध करू लागले आहे.

निरनिराळ्या गॅजेटच्या माध्यमातून कंपन्यांमध्येही स्पर्धा सुरू झाली आहे. नव्या गॅजेटच्या वापरकर्त्यांमध्ये आपली मक्तेदारी वाढवण्यासाठी कंपन्यांमध्येही स्पर्धा वाढणार आहे. अशा वेळी उच्च दर्जाची सायबर सुरक्षा या सगळ्या यंत्रणेचा कणा असेल. तुलनेत सद्यस्थितीला सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे मोठे पथक गरजेचे असेल. दुसरीकडे, ई-कॉमर्स सेवेचा बोलबाला पाहता सायबर सुरक्षेच्या दृष्टीने हे क्षेत्रही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणूनच, येत्या काळात इन्फॉर्मेशन सिक्‍युरिटी ऑफिसरची मागणी मोठी असेल. 

ठाणे, नवी मुंबई यांसारखा परिसरात ‘स्टार्ट अप’साठीही राज्य सरकारचे धोरण आहे. त्यासाठीची गुंतवणूक कशी येईल, पायाभूत सुविधा कशा देता येतील आणि भांडवली गुंतवणुकीसाठी काय मदत करता येईल, याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगानेच आपल्याकडे कौशल्य विकास क्षेत्रात अशा कुशल मनुष्यबळाचा फौजफाटा तयार करण्यासाठीचे व्हिजन व धोरण निश्‍चित होणे गरजेचे आहे. 

‘नॅसकॉम’च्या अहवालानुसार ८० टक्‍क्‍यांपर्यंत स्मार्टफोनचा वापर वाढणार आहे. स्मार्टफोन निर्मितीमधील अनेक बड्या कंपन्या देशात, राज्यात उत्पादन केंद्र स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. ॲपलपासून फॉक्‍सकॉनसारख्या कंपन्यांनी तशी घोषणाही याआधीच केली आहे.

म्हणूनच स्वस्त होणारे स्मार्टफोन आणि स्मार्टफोनचा वापर नवी क्रांती घडवणार आहे. ‘क्‍लाऊड’वर आधारित मोठ्या प्रमाणावरील ॲप्लिकेशन, इंटरनेट ऑफ थिंग्जच्या माध्यमातून एका उपकरणाचा दुसऱ्या उपकरणाशी संवाद यांसारख्या गोष्टी ‘फोर्थ जनरेशन रिव्होल्युशन’मध्ये घडणार आहे.

उपक्रम आणि योजना

  • २८००० ग्रामपंचायतींना डिजिटल कनेक्‍टिव्हिटी
  • २५००० शाळा डिजिटल
  • आयटीआय व्हर्च्युअल क्‍लासरूमने जोडणे
  • स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज
  • सायबर सुरक्षा अभियान
  • टेलिमेडिसिनची प्रभावी अंमलबजावणी
  • आधार कार्ड लिंकेज
  • मुंबईत सीसी टीव्हीचा प्रकल्प
  • २००० सर्व्हेलन्स वीजखांबांची उभारणी
  • इंटरनेटसाठी मुंबईत ५०० हॉट स्पॉट्‌सची सुरुवात
  • १ मे २०१७ पर्यंत १२०० हॉट स्पॉट
  • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षकांना
  • सोशल मीडियाद्वारे अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण

तज्ज्ञ म्हणतात
डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी, कॅशलेस व्यवहार, इंटरनेट ऑफ थिंग्ज, क्‍लाऊड कॉम्प्युटिंग ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आगामी वर्षातील आव्हाने आहेत. सायबर सुरक्षेकरता खासगी आणि सरकारी पातळीवर कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे.  
- संजय काटकर, क्विक हिल टेक्‍नॉलॉजी.

ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी यावर आधारित वेगळा अनुभव गॅझेट वापरकर्त्यांना मिळावा, असे मोबाईल कंपन्यांने लक्ष्य आहे. एकेकाळी सिंबियन तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोनचा कल आता ॲण्ड्रॉईड तंत्रज्ञानावर आहे. ॲण्ड्रॉईडवर आधारित अनेक ॲप्लिकेशनच्या निर्मितीवर सध्या भर आहे. 
- निखिल मालवणकर, गेमिंग एक्‍स्पर्ट.

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’सारख्या इलेक्‍ट्रॉनिकवर आधारित तंत्रज्ञानामुळे गॅझेट, उपकरणांचा एकमेकांशी संवाद वाढणार आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक आणि आयटी अशा दोन्ही क्षेत्रात रोजगाराला वाव मिळेल. उत्पादन क्षेत्रात होणारे नवीन प्रयोग, संकल्पना यानिमित्ताने उदयास येणाऱ्या स्टार्ट अपचेही महत्त्व वाढेल.   
- सचिन टेके, संस्थापक, एम इंडिकेटर.

मुंबई आणि नवी मुंबईत आयटी कंपन्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आदी अनेक बड्या कंपन्यांचे डाटा सेंटर एमएमआर क्षेत्रात उभारण्यास सुरुवात झाली आहे. सायबर सुरक्षिततेसाठीही विद्यार्थ्यांत जनजागृती करण्याकरता अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. 
- विजयकुमार गौतम, मुख्य सचिव, माहिती तंत्रज्ञान.

कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून डिजिटल शिक्षणाचे महत्त्व प्रत्येक क्षेत्रात वाढणार आहे. आयटीवर आधारित कौशल्य विकासाला त्यामुळेच महत्त्व येणार आहे. एकाच वेळी अनेक उपकरणे इंटरनेटच्या माध्यमातून जोडली जातील, असा इंटरनेट ऑफ थिंग्जचा ट्रेण्ड आगामी काळात आणखी वाढेल.      
- डॉ. अजय डाटा, संस्थापक, डेटा इन्फोसिस लि.

वेब डेव्हलपर आणि ॲप डेव्हलपरसारख्या सेवांनाही ‘ऑन डिमांड सर्व्हिस’ म्हणून मागणी आहे. स्टार्ट अपच्या निमित्ताने आयटी क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्यांचे महत्त्व वाढणार आहे. स्थानिक पातळीवर आयटीवर आधारित सेवांना महत्त्व येतानाच सेवेशी संबंधित मनुष्यबळाची गरज आणखी वाढेल.   
- सुहेल वटगावकर, उपाध्यक्ष, ग्राहक सेवा अर्बन क्‍लॅप.

पायथॉन, जॅंगो यांसारख्या नव्या तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही नवे अभ्यासक्रम येत आहेत. स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरही माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवठादारांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  कुशल मनुष्यबळावर सध्या या कंपन्यांचा भर आहे.  
- दिनेश गोएल, सीईओ, आसान जॉब.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्रामअंतर्गत प्रोग्रामिंग आणि टायपिंगचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीच्या माध्यमातून व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत राज्यात १६९८ ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येते. अनेक छोट्या व्यवसायांत प्रोग्रामिंगला महत्त्व येणार आहे.
- दीपक कपूर, प्रधान सचिव, कौशल्य विकास विभाग.

किरकोळ दुकानदारापासून एखाद्या स्टार्ट अप मॉडेललाही आता माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व पटू लागले आहे. काही वर्षांत प्रोग्रामिंगवर आधारित सात लाख जणांसाठी रोजगाराची निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. अनेक प्रकारच्या कामांमध्ये क्‍लाऊडवर आधारित तंत्रज्ञानाची व्याप्ती काही वर्षांत आणखी वाढणार आहे.  
- रामकी गद्दीपती, सहसंस्थापक, झेटा.

एखादी गाडी खरेदी करतानाही सहज सोप्या वेबसाईट, सॉफ्टवेअरचा वापर यामुळे छोट्या वाहन विक्रेत्या, वितरकांना या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा झाला आहे. त्यामुळेच ग्राहकांशी थेट संवाद आणि तोही सहज झाला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला स्पर्धा करण्याचा पर्याय माहिती तंत्रज्ञानामुळेच शक्‍य झाला आहे.
- शुभ बन्सल, सहसंस्थापक, ट्रूबिल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com