अतिक्रमण, कोंडी अन्‌ बेकायदा पार्किंगचा विळखा

कृष्ण जोशी 
सोमवार, 22 एप्रिल 2019

‘आरे’ची वनजमीन, खाडीपट्ट्यातील खाजण जमीन, खारफुटींवरील अतिक्रमण, मेट्रो कामांमुळे प्रमुख रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि रेल्वेस्थानकांना पडलेला वाहनांचा विळखा अशा प्रमुख समस्या वायव्य मुंबई मतदारसंघात वर्षानुवर्षे जाणवत आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे रहिवासी मात्र भरडले जात आहेत.

उत्तर पश्‍चिम मुंबई
दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्‍वरी, वर्सोवा, अंधेरी पश्‍चिम आणि अंधेरी पूर्व असा वायव्य मुंबई मतदारसंघाचा पसारा आहे. अंधेरी-वर्सोवा येथील समुद्रकिनारा आणि आरेचे डोंगर व जंगल असे भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे दोन भाग या मतदारसंघात येतात. या मतदारसंघात अवाढव्य झोपडपट्ट्या आहेत. लोखंडवालासारखा अभिनेत्यांची निवासस्थाने असलेला परिसरही याच भागात आहे. येथे झोपड्यांमधील निकृष्ट दर्जाची शौचालये ते रस्त्यांवर वाहनांचे होणारे अनधिकृत पार्किंग अशा सर्व प्रकारच्या समस्या दिसून येतात. रेल्वे प्रवाशांना होणारा त्रास आणि अत्याधुनिक मेट्रोच्या उभारणीमुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी अशा सर्व स्तरांवरच्या समस्या भेडसावत असतात. 

दिंडोशी परिसरातील आरेच्या वनजमिनीवर आणि दुसरीकडे गोरेगाव ते अंधेरी समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटींवर होणारे अतिक्रमण या वायव्य मुंबईतील प्रमुख समस्या आहेत. दोन्ही ठिकाणी राजकीय वरदहस्त असल्यामुळेच अवैध झोपड्या मोठ्या प्रमाणात फोफावल्या आहेत. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्ग आणि लिंक रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यातच आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या उभारणीमुळे जंगलतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमी नाराज आहेत. अवैध झोपड्यांमधील अपुरा पाणीपुरवठा, नादुरुस्त शौचालये आदी समस्यांबरोबरच पुनर्विकासातील फसवणुकीचाही प्रमुख प्रश्‍न आहे. हार्बर रेल्वेमार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार झाल्याने त्याचा प्रवाशांना गर्दीच्या वेळी चांगलाच फायदा होतो. मात्र, इथून पनवेलला अजूनही लोकल सुटत नाही. वांद्य्रापासून पाचवा रेल्वेमार्ग सुरू झाला; पण सहावी मार्गिका सुरू झाली की, प्रवास आणखी सोपा होणार आहे. मात्र, त्यात आणखी काही वर्षे जातील. 

वर्सोवा-वेसावे येथील मच्छीमारांच्या घरांचा पुनर्विकास, घराशेजारील जमिनी त्यांच्या किंवा गावाच्या नावावर करणे, तेथील बंदराचा विकास, खाडीतील गाळ काढणे हे प्रश्‍नही प्रलंबित आहेत. खासदार गजानन कीर्तिकर व स्थानिक आमदार भारती लव्हेकर यांनी हे प्रश्‍न सोडविण्यासाठी बरीच धडपड केली हेदेखील खरे आहे. 

आरेच्या डोंगरांमधून उगम पावणारी स्वच्छ ओशिवरा नदी पश्‍चिम द्रुतगती महामार्ग ओलांडून पश्‍चिमेला आली की, तिच्यात नागरी वस्तीतून सांडपाणी मिसळण्यास सुरुवात होते आणि समुद्राला मिळेपर्यंत तिचे रूपांतर नाल्यात होते. अर्थात, वरीलपैकी अनेक प्रश्‍न स्थानिक नगरसेवक, आमदार व राज्य सरकार यांनी सोडवायचे आहेत. मात्र, खासदारांसह साऱ्यांनी एकत्र येऊन, पाठपुरावा करून आणि जरूर तर कठोरपणे संबंधितांवर दडपण आणले, तर त्यांची उत्तरे नक्कीच मिळतील. 

मतांची गोळाबेरीज शिवसेनेसाठी अनुकूल 
दिंडोशी, जोगेश्‍वरी आणि अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आहेत. अन्य तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. युतीमुळे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांची स्थिती भक्कम मानली जात आहे. त्यातच काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा टोकाचा विरोध असल्याने तो मुद्दाही काँग्रेसला प्रतिकूल ठरण्याची शक्‍यता आहे. पहिल्या टप्प्यात युतीच्या दोन्ही पक्षांचे आमदार कीर्तिकर यांच्याबरोबर असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला मिळू शकतो. जोगेश्‍वरी, अंधेरी येथील मुस्लिम मते काँग्रेसला मिळतील, असेच सध्याचे चित्र आहे. बरीचशी उत्तर भारतीय मतेही निरुपम यांना मिळतील, अशी शक्‍यता आहे. मात्र, मतदारसंघातील ३६ टक्के मराठीभाषक व १२ टक्के गुजराती-मारवाडी आणि सात टक्के दक्षिण भारतीय यांच्या मतांची बेरीज शिवसेनेसाठी अनुकूल आहे. गजानन कीर्तिकर यांनी पाच वर्षे या समस्या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधार समितीच्या सभासदांची फौज कीर्तिकरांसाठी काम करत आहे. त्याचाही फायदा त्यांना होईल, असे चित्र आहे.

राजकीय इच्छाशक्ती अपुरी
पावसाळ्यात अंधेरी ते मालाडपर्यंतच्या सखल भागांत साचणाऱ्या पाण्याची समस्या गेल्या वर्षीपर्यंत तरी सुटली नव्हती. खाडीपट्ट्यात अतिक्रमण करून उभ्या राहिलेल्या झोपड्यांमुळे समुद्रात पाणी नेणाऱ्या खाड्यांची तोंडे अरुंद झाल्याने समस्या उभी राहिली आहे. ती सोडवायची असेल तर खाडी अरुंद करणाऱ्या झोपड्यांचे पुनर्वसन कोठे करायचे हा कळीचा मुद्दा आहे. तिथेच सारे गाडे अडते. ही समस्या सोडविण्याची राजकीय इच्छाशक्ती कोणीच दाखवत नसल्याने पुराचे पाणी कधी ओसरणार, हा गहन प्रश्‍न नागरिकांसमोर आहे. 

गोरेगाव ते अंधेरीपर्यंत रेल्वेस्थानकांच्या दोन्ही बाजूंना जुन्या इमारतींमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी इथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यासाठी संपूर्ण परिसराचा क्‍लस्टर पद्धतीने पुनर्विकास करणे जरूरी आहे. मात्र, तशी इच्छाशक्ती दाखवणारा सर्वमान्य नेता नसल्याने ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ अशा प्रकारे सारे सुरू आहे.

Web Title: Encroachment, traffic and unauthorized parking