वर्सोवा परिसरातील 138 बांधकामांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - वर्सोवा परिसरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील जमिनींवरील तसेच सागरी नियमन क्षेत्रातील (सीआरझेड) बेकायदा 138 बांधकामांवर महापालिकेने धडक कारवाई करत अतिक्रमणे पाडली. मालवणी, मढ, राठोडी, चिकुवाडी आदी परिसरातील खासगी जागांवरील 35 बेकायदा बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली. चित्रीकरणाचे सामान ठेवलेली बेकायदा गोदामेही पाडण्यात आली. उर्वरित 11 बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

वर्सोवा परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल नगराजवळील सिद्धार्थनगर परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या सीआरझेड क्षेत्रातील जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार पालिकेने ही एकत्रित कारवाई केली. पालिकेचे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणीत "पी उत्तर' विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी ही कारवाई केली.

मढ, मालवणी, राठोडी, चिकुवाडी, पटेलवाडी, धारावली, टोकारा, शंकरवाडी आदी परिसरात चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी लागणारे सामान ठेवण्याकरिता तीन बेकायदा गोदामे बांधण्यात आली होती. खासगी जमिनीत महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता या गोदामांसह एकूण आठ व्यावसायिक स्वरूपाची बेकायदा बांधकामे करण्यात आली होती. या वेळी कडक पोलिस बंदोबस्तही होता.

Web Title: encroachment in varsova