साहित्यनगरीची उभारणी अखेरच्या टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पाच एकरांत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात मुख्य मंडपासह प्रदर्शनी

ठाणे - डोंबिवलीत येत्या शुक्रवारपासून (ता.3) सुरू होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाचा परिसर सजू लागला आहे. शं. ना. नवरे सभामंडप, रा. चिं. ढेरे ग्रंथग्राम, डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडप, सावित्रीबाई फुले कलामंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो कामगारांचे हात संमेलनाच्या तयारीत गुंतले आहेत. साहित्यनगरीची उभारणी अखेरच्या टप्प्यात असून, मराठी साहित्य आणि संस्कृतीचे परिपूर्ण दर्शन संमेलनस्थळातून देण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे. कला-दिग्दर्शक संजय दबडे यांच्या कल्पनेतून या मुख्य मंडपातील व्यासपीठ तयार होत आहे. वारली संस्कृती, साहित्यिकांच्या प्रतिकृती, संतांची मंदिरे, संमेलनाचे बोधचिन्ह, मुख्य व्यासपीठावर ग्रंथांच्या पानांची प्रतिकृती, पुस्तकाच्या भिंती, मुख्य मंडपाच्या मध्यवर्ती संमेलनाचे बोधचिन्ह, भव्य गणेशमूर्ती आणि अशा अनेक भव्य कलाकृती संमेलनस्थळी साकारण्यात येत आहेत.

पाच एकरच्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपासह दोन छोट्या मंडपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य मंडपामध्ये 12 हजारांच्या आसपास साहित्यरसिक बसू शकतील; तर अन्य ठिकाणी सातशे-सातशे साहित्यप्रेमी बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य मंडपालगत 350 स्टॉल्समधून साहित्यविक्री होणार आहे. सावित्रीबाई फुले कलामंदिरातही मुख्य सभागृहात आणि मिनी थिएटरमध्येही कार्यकम चालणार आहेत. मुख्य मंडपाजवळ साडेचार हजार व्यक्ती जेवण्याइतकी भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. चार भव्य स्क्रीन्सवरून संमेलनाचे दर्शन पाहण्याची व्यवस्था आहे. संमेलनात येणाऱ्या नागरिकांना उंचावरून फोटो काढण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. बहिणाबाई चौधरी, पु. ल. देशपांडे, पु. भा. भावे, शं. ना. नवरे या साहित्यिकांच्या प्रतिकृती संमेलनस्थळी पाहायला मिळणार आहेत.

लक्षवेधी व्यासपीठ...
संमेलनाचा मुख्य सभामंडप 450 बाय 250 फुटांचा आहे. तेथे 11 ते 12 हजार साहित्यप्रेमी बसू शकतील. त्यांच्या समोरील मुख्य व्यासपीठ 80 बाय 70 फुटांचे असणार आहे. त्याच्या मागे संमेलनातील मान्यवरांसाठी ग्रीन रूम साकारली जाईल. मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला ग्रंथांची पाने बसवली जातील. त्यावर मराठी भाषेतील ग्रंथांची नावे आणि मुखपृष्ठ रेखाटण्यात येणार आहेत. व्यासपीठावर ज्ञानाची देवता सरस्वतीची मूर्ती असेल. मराठी साहित्यरसिकांना साहित्याचा मनमुराद आनंद घेता येईल, अशी व्यवस्था केल्याची माहिती संयोजन समितीने दिली.

Web Title: At the end of the phase sahitya nagari