esakal | आच्छाड सीमा नाका गैरव्यवहार अधिकाऱ्यांना भोवणार?; चौकशी अहवाल लवकरच सुपूर्त...
sakal

बोलून बातमी शोधा

RTO

परराज्यातील खासगी बस वाहतूकदारांकडून लॉकडाऊन काळात राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यावरून सर्रास प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार जून महिन्यात उघडकीस आला होता.

आच्छाड सीमा नाका गैरव्यवहार अधिकाऱ्यांना भोवणार?; चौकशी अहवाल लवकरच सुपूर्त...

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या आच्छाड सीमा तपासणी नाका प्रकरणातील चौकशी अंतिम टप्यात पोहोचली आहे. लॉकडाऊन काळात या तपासणी नाक्यावरून गुजरात, राजस्थान राज्यातील खासगी बस वाहतूकदारांकडून कोणताही कर न घेता आणि कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन करून महाराष्ट्रात प्रवेश दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. त्यानंतर परिवहन आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असून लवकरच हा अहवाल पुढे येण्याची शक्यता आहे. 

ऐन लॉकडाऊनमध्ये सिडकोने उगारला कारवाईचा बडगा; आमदार म्हात्रेंनी केली कारवाई थांबवण्याची मागणी...

परराज्यातील खासगी बस वाहतूकदारांकडून लॉकडाऊन काळात राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यावरून सर्रास प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार जून महिन्यात उघडकीस आला होता. मुंबई बस मालक संघंटनेने आरटीओ अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून स्वतः मैदानात उतरत परराज्यातील खासगी बस पकडून दिल्या होत्या. त्यानंतर 'सकाळ'ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरील 20 मोटार वाहन निरिक्षकांची कार्यालयात बदली करण्यात आली होती; तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

'डीसीजीआय'च्या कठोर नियमावलीमुळे प्लाझ्मा दानाला अत्यल्प प्रतिसाद; जाणून घ्या नियमावली...

मात्र, परराज्यातील गाड्या सुरूच असल्याच्या तक्रारी मुंबई बस मालक संघंटनेने परिवहन आयुक्तांकडे केल्याने अखेर या प्रकरणात आयुक्तांनी 25 जून रोजी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर 15 दिवसांमध्ये चौकशी अहवाल सोपविण्याचे आदेश सुद्धा यामध्ये देण्यात आले होते. त्यानंतर आता चौकशीचा अवधी पूर्ण झाला असून लवकरच हा अहवाल परिवहन विभागाला सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यामुळे या अहवालानंतर आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरील गैरप्रकारात सहभागी अधिकाऱ्याची नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने आखली 'ही' योजना


चौकशी अहवालाला कोणतीही मुदवाढ दिली नाही किंवा चौकशी अधिकाऱ्यांनी कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे लवकरच चौकशी अहवाल प्राप्त होणार असून त्यानुसार कायदेशीर निर्णय घेण्यात येईल.
- शेखर चन्ने, आयुक्त, परिवहन विभाग

---
संपादन : ऋषिराज तायडे