येऊरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी प्रवेश शुल्क 

ठाणे : येऊरच्या प्रवेशद्वारावर प्रवेश शुल्काबाबत माहिती देताना वन कर्मचारी (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : येऊरच्या प्रवेशद्वारावर प्रवेश शुल्काबाबत माहिती देताना वन कर्मचारी (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : आरोग्य सुदृढ राखण्यासाठी किंबहुना गुलाबी थंडी आणि निसर्गाच्या सानिध्याचा लाभ घेण्यासाठी अनेकजण ठाण्यानजीकच्या येऊर या निसर्गरम्य वनक्षेत्रात दररोज सकाळ-सायंकाळ प्रभातफेरीसाठी (मॉर्निंग वॉक) जात असतात. हा परिसर वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असल्याने येथे वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. आता येऊरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला असून, प्रवेश पत्राशिवाय प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.

प्रवेश पत्र नसल्यास दंडात्मक कारवाईसह तुरुंगवास भोगावा लागेल, असा फतवाच वनविभागाने काढला आहे. या सशुल्क प्रवेश पत्रामुळे येऊरला येणाऱ्या नागरिकांच्या खिशाला मात्र चांगलीच फोडणी बसणार आहे. 

शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे निसर्गाचे सानिध्य हरवू लागले आहे. तर, यांत्रिकीकरणामुळे माणसाची शारीरिक हालचाल कमी झाली आहे. परिणामी विविध आजारांसह मानसिक आरोग्याचे प्रश्नही भेडसावू लागले आहेत. यासाठी अनेक जण मॉर्निंग वॉकचा सहजसोपा उपाय अवलंबत असतात. ठाण्याच्या वेशीवर उपवन तलावानजीक येऊरचे निसर्गरम्य जंगल असून हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोडतो. त्यामुळे अनेकजण मॉर्निंग वॉकला येऊरमध्ये येतात. 

बुधवारी पहाटेच्या वेळी येऊरच्या रस्त्यालगत बिबट्याचा बछडा आढळल्याने पुन्हा येऊर चर्चेत आले. या नवजात बछड्याची त्याच्या आईशी भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र येऊरमधील नागरिकांच्या गजबजाटामुळे आणि बिबट्या मादीने बछड्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्यात यश आले नाही. या बछड्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात निगराणीखाली ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने येऊरमध्ये ये-जा करण्यावर निर्बंध लादले आहेत. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रभातफेरीसाठी वनविभागाने प्रवेश शुल्क लागू करण्याचा नियम काटेकोरपणे अवलंबण्याचा ठरवले आहे. त्यानुसार, मासिक अथवा वार्षिक प्रवेश पत्राशिवाय येऊरमध्ये प्रभातफेरीला मज्जाव करण्यात आला आहे. प्रवेश पत्रासाठी मासिक शुल्क जेमतेम 100 च्या आपसास असून वार्षिक 215 रुपये शुल्क आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना 25 रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येत आहे. वनविभागाच्या प्रवेश पत्राशिवाय येऊर वनपरिक्षेत्रात कुणी आढळल्यास 3 वर्षे तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंडाची तरतूद असल्याचा फलक वनविभागाने येऊरच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. 

येऊरचा हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असल्याने येथे वन्यप्राण्यांचा सर्रास वावर असतो. वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानवाने घुसखोरी करू नये यासाठी सरकारनेच काही नियम केले आहेत. त्यानुसार, प्रभातफेरीसाठीही प्रवेश शुल्क आकारण्यात येत असून हा जुनाच नियम आहे. अनेकजण विनापास येऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. काहीजण रीतसर पास घेतात. मात्र, हे प्रमाण तुलनेने कमी होते. 9 डिसेंबरपासून पुन्हा हा नियम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. 
- राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com