आयआयटी शोधणार विद्यार्थ्यांमधील उद्योजक!

आयआयटी शोधणार विद्यार्थ्यांमधील उद्योजक!

मुंबई - आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये चांगल्या कंपन्यांत मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता आयआयटीने विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई वेगवेगळे अभ्यासक्रम आणण्याप्रमाणे संशोधनासाठी विविध कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करणार आहे.

आयआयटीतील शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. हे विद्यार्थी नावीन्यपूर्ण संशोधनही करतात. अशा विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्यासाठी आयआयटी मुंबईने प्रयत्न सुरू केले आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक परवानग्या व आर्थिक पाठबळ मिळवणे, उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होणे आदी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आयआयटी मुंबईने माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. 

उपक्रमात आयआयटी मुंबईतून शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक झालेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यात येईल. त्यांच्या मदतीने सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे व छोटे अभ्यासक्रम घेण्यात येतील. त्याचबरोबर व्यवसायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशी-विदेशी बाजारपेठा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी आयआयटी मुंबई वेगवेगळ्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करणार आहे. कराराद्वारे संशोधनावर अधिक भर देण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा लाभ सामान्य नागरिकांना व्हावा यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे आयआयटी मुंबईचे नवनियुक्त संचालक प्रो. सुभाषीस चौधरी यांनी सांगितले. चौधरी यांनी आयआयटी मुंबईचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी अकॅडमी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर अफेअरचे प्रमुख व उपसंचालक प्रा. ए. के. सुरेश व फायनान्स ॲण्ड एक्‍स्टर्नल अफेअरचे प्रमुख व उपसंचालक प्रा. पी. एम. मुजुमदार उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव
आई-वडिलांच्या इच्छेखातर अनेक विद्यार्थी अभियंता होण्यासाठी आयआयटीमध्ये प्रवेश घेतात. त्यापैकी अनेकांना अभियांत्रिकीत रस नसतो. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईने अशा विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी पावले उचलली आहेत. आगामी शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येण्याची  शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com