पर्यावरणाचा अहवालच ‘प्रदूषित’

पर्यावरण अहवालात अनेक त्रुटी
पर्यावरण अहवालात अनेक त्रुटी

पनवेल : पालिका हद्दीच्या पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबत तयार करण्यात आलेल्या अहवालाबाबत प्रदूषणाच्या मुद्द्यावर हरित लवादात गेलेले शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्यासह खारघर- तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्‍यांनी असमाधान व्यक्त केले आहे. तसेच अहवाल तयार करत असताना कोणत्याही प्रकारच्या चाचण्या न घेताच अहवाल तयार करण्यात आला असल्याचा आक्षेप नगरसेवक म्हात्रे यांनी घेतला आहे.

सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण महासभेत २०१८-१९ च्या अहवालाचे सादरीकरण करण्यात आले.  प्राध्यापक डॉ. एस. एम. कोठे यांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक क्षेत्र, बांधकाम तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सुरू असलेल्या भरावाचा परिणाम प्रदूषणवाढीवर झाल्याची माहिती देण्यात आली असून भूपृष्‍ठाच्या तापमानातही झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याचे डॉ. कोठे यांनी जाहीर केले.

पालिकेने पर्यावरणविषयक जागरूकता दाखवत पर्यावरणाच्या हिताचे कार्यक्रम राबवल्यास भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखणे सोपे जाईल, असे मत व्यक्त केले. या वेळी डॉ. कोठे यांनी सादर केलेल्या अहवालाबाबत बोलताना प्रदूषणाच्या मुद्द्यावर हरित लवादात गेलेल्या शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी असमाधान व्यक्त करत अहवाल तयार करताना परिसरातील नद्यांमधील पाण्याचे तसेच ग्रामीण भागातील बोअरवेल, विहिरी तसेच तलावातील पाण्याचे नमुने गोळा करून पाण्यातील जीवसृष्टीकरिता आवश्‍यक असलेले सीओडी आणि बीओडीचे प्रमाण तपासणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच वायुप्रदूषणाची तपासणी करताना स्वतःची यंत्रणा न वापरता एमपीसीबीची यंत्रणा वापरण्यात आली असून, कांदळवन क्षेत्रात सीआरझेड क्षेत्र कुठपर्यंत आहे, हेच तपासण्यात आले नसल्याचे सांगितले. 

शुभेच्छापत्रातील उपमहापौरांच्या संदेशात चूक
अहवालात पर्यावरण अहवालाबाबत शुभेच्छा देण्यासाठी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या छापण्यात आलेल्या शुभेच्छापत्रात अंबरनाथ पालिकेच्या २०१६-१७ च्या अहवालाबत शुभेच्छा छापण्यात आल्याने झालेल्या या चुकीबाबत चर्चा सुरू होती.

अहवालाबाबत असमाधानी असलो तरी कुठे तरी पर्यावरणाबाबत काम करण्यास सुरुवात झाल्याचे समाधान आहे.
- मंगेश रानवडे, 
अध्यक्ष, खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com