पाळणाघरात मुलाला सोडून गेलेली आई पुन्हा परतलीच नाही 

kalyan news
kalyan news

डोंबिवली : ठाणे जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीला जाण्याचा प्रकार समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. आता डोंबिवली नजीक निळजे येथे घरगुती पाळणाघर चालविणा-या एका महिलेकडे याच परिसरातील एका महिलेने आपले मुल सांभाळण्याकरिता दिले होते. मात्र, चार महिने उलटून गेले तरी या मुलाची आई त्याला पुन्हा घरी नेण्यासाठी आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.           

डोंबिवली नजीक निळजे गावात शंकुतला सुष्टी या इमारतीत राहणा-या किरण प्रकाश शेट्टी या घरगुती पाळणाघर चालवतात. याच  परिसरात राहणा-या जान्हवी नामक एका महिलेने आपल्या मयूर या पाच वर्षांच्या मुलाला किरण यांच्या पाळणाघरात ठेवले होते. सुरवातीला इतर पालकांप्रमाणे ही महिला आपल्या मुलाला सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी  येत होती. मात्र  ऑगस्ट 2017 पासून ही महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी पुन्हा आलीच नसल्याने एकच खळबळ उडाली आहे.        

सिव्हिल  रुग्णालयाचे प्रकरण समोर आल्याने पाळणाघर चालविणा-या किरण शेट्टी या घाबरल्या. संबंधित मुलाची आई सुरवातीला इतर पालकांप्रमाणे ने-आण करत होती. मात्र, चार महिने  उलटून गेले तरी ही महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी आली नाही. वारंवार किरण यांनी मुलाच्या आई सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही महिला फोनवर बोलणे टाळत असल्याचे किरण यांनी सांगितले. तसेच डिसेंबर महिन्यात या महिलेशी संपर्क झाला असता तिने मुलाला नेण्यास नकार देत आता मुलाला मी सांभाळू शकत नाही असे सांगितले. 

त्यानंतर त्यांनी संबंधित प्रकार सोसायटी मधील रहिवाशांना सांगितला. याबाबत एका अज्ञात व्यक्तीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांना संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुरुवारी सकाळी भोईर यांनी  स्थानिक नगरसेवक प्रभाकर जाधव आणि मनसे तालुका उपाध्यक्ष गजानन पाटील , सोसायटीतील रहिवासी यांच्यासह किरण यांच्या घरी जाऊन अधिक चौकशी केली असता किरण यांनी सर्व हकिकत सांगितली.

लोकप्रतिनिधींनी दिला मदतीचा हात 
किरण यांची परिस्थिती बेताची असून या मुलाचा सांभाळ करताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत. तरीही मुलाची जबाबदारी आपली आहे असे सांगत किरण यांना रडू आवरले नाही. याप्रकरणाचा जोपर्यंत काही ठोस छडा लागत नाही तोवर या मुलाच्या संगोपनासाठी काही मदत लागल्यास संपर्क करा असे आवाहन  मोरेश्वर भोईर, गजानन पाटील आणि प्रभाकर जाधव यांनी किरण यांना केले आहे. 

सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन 
सध्या मुले चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पाळणाघराच्या माध्यमातूनही कोणी अज्ञात व्यक्ती मुलांना या ठिकाणी सोडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे असा काही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी केले आहे. 

आईच्या आठवणीने मुलगा गहिवरला...
तब्बल चार महिने उलटून गेले तरी आपली आई आपल्याला घ्यायला आली नाही त्यामुळे पाच वर्षीय मयूरचे डोळे भरून आले. मयूर आपल्या आईला "शोना" या नावाने आवाज देतो. तर वडिलांचे नाव " मॉन्टी " असल्याचे त्याने सांगितले. "कुठे राहतोस" असे विचारल्यावर  "मी शोनाच्या बिल्डींग मध्ये राहतो असे सांगत त्याला गहिवरून आले. मात्र, आता मुलाला पुन्हा घेऊन जाण्यास आईनेच नकार दिला असून मुलाचे काहीपण करा असेही सांगितले आहे. त्यामुळे या चिमुकल्याला नेमके काय  सांगावे या  विचाराने लोकप्रतिनिधी सह  सर्वांनाच गहिवरून  आले. 

सदर महिलेचा फोटो , मोबाईल नंबर आदी माहिती प्राप्त झाली असून याबाबत मानपाडा पोलीसांची भेट घेत सर्व प्रकार त्यांना सांगण्यात आला आहे. याया प्रकरणाचा लवकर तपास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
मोरेश्वर भोईर, उपमहापौर, केडीएमसी


या प्रकरणाला अनेक पैलू असू शकतात त्यामुळे सध्या  कोणत्याही निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र , उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे लागलीच तपास सुरू करण्यात आला आहे. पाळणा घरातील महिला आणि   संबंधित मुलाची चौकशी करून तक्रार नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
गजानन काब्दुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com