अंबरनाथ सराफ दुकानातील चोरीप्रकरणी दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौकात असलेल्या सागर सराफाच्या दुकानात रविवारी (ता. 8) चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीचे ग्रील वाकवून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा एकूण 2 कोटी 36 लाख 70 हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. ही चोरी दुकानातील सीसी टीव्ही फुटेजमध्ये कैद झाली.

ठाणे : अंबरनाथ येथील सराफाचे दुकान फोडून 2 कोटी 36 लाखांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात ठाणे पोलिस परिमंडळ 4 च्या पोलिसांना यश आले. विनोद रामबली सिंग (वय 49) व पारस छबिलदास जुबेलिया (वय 45) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 1 कोटी 70 लाख 65 हजारांचा मुद्देमाल व 4 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त मधुकर पांडे यांनी दिली. 

अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौकात असलेल्या सागर सराफाच्या दुकानात रविवारी (ता. 8) चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीचे ग्रील वाकवून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा एकूण 2 कोटी 36 लाख 70 हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. ही चोरी दुकानातील सीसी टीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. त्यानुसार ठाणे पोलिस परिमंडळ 4 व अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी विविध पथके तैनात करून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद सिंग याला पोलिसांनी मिरा रोड येथील त्याच्या घरातून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 62 लाख 99 हजार रुपये किमतीच्या 2 किलो 380 ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या लगडी; तसेच 25 लाख 95 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. तर बोरिवली येथून पारस जुबेलीया या दुसऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून 81 लाख किमतीची सहा सोन्याची लगडी जप्त केली. या दोन्ही आरोपींकडून ठाणे पोलिसांनी 6 किलो 269 ग्रॅम वजनाचे सुमारे 1 कोटी 70 लाख 65 हजार रुपये किमतीचा ऐवज व 4 लाख 50 हजार रुपये रोख जप्त केली. 

Web Title: esakal news ambarnath mumbai

टॅग्स