म्हाडातर्फे मुंबईतील ८१९ सदनिकांची १० नोव्हेंबरला सोडत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ वाजेपासून दि. २१/१०/२०१७ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे.

मुंबई- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतीतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सदर सोडतीकरिता जाहिरात शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये व म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे,  अशी माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.    
      
सदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ वाजेपासून दि. २१/१०/२०१७ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारास नोंदीत माहितीमध्ये दिनांक १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २२/१०/२०१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येणार आहे.  नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २२/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. बँकेत डीडी स्वीकृती दि. १७/०९/२०१७ ते दि. २५/१०/२०१७ या कालावधीत केली जाणार आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.  NEFT / RTGS  द्वारे चलन निर्मिती दि. १७/०९/२०१७ दुपारी २ ते दि. २३/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत करता येणार आहे. NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी दि. १७/०९/२०१७ दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत कालावधी असणार आहे.डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.  

यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता दि. ०१/०४/२०१६ ते ३१/०३/२०१७ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे  सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु. ७५,००१ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. १५,३३६/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,३३६ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,३३६ प्रति अर्ज,  उच्च उत्पन्न  गटाकरिता रु. ७५,३३६ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज  रु. ३३६ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे. 

यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली या ठिकाणी एकूण आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप  कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षा नगर- सायन,  सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम),  उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड येथील एकूण २८१ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल - मुंबई, तुंगा - पवई, चारकोप  कांदिवली (पश्चिम), शिंपोली -कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

Web Title: esakal news mumbai mhada lottery dates announced