खबरदार ! रस्त्यावर कचरा टाकल्यास 200 रूपये दंड

भगवान खैरनार
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

पालघर जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हगणदारी मुक्त जिल्हा करून राज्यात हगणदारी मुक्त पहिला आदिवासी जिल्हा होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. आता नागरिकांचे आरोग्य ऊत्तम रहावे म्हणून स्वच्छ गाव, सुंदर गाव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने मोखाड्यातील खोडाळा ग्रामपंचायत पुढे सरसावली आहे.

मोखाडा - पालघर जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियानाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. मोखाड्यातील खोडाळा ग्रामपंचायतीने त्यातच एक पाऊल पुढे टाकत, गावात रस्त्यावर कचरा टाकणे व साठवल्यास त्या व्यक्तीला 200  रूपये दंड आकारण्याचा तर या घटनेची खबर देणाऱ्यास 100 रूपये बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठराव 2 ऑक्टोबर च्या ग्रामसभेत ही घेतला आहे. त्यामुळे आता स्वच्छ भारत अभियानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी, खोडाळा ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाईचे फर्मान सोडले आहे. 

पालघर जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हगणदारी मुक्त जिल्हा करून राज्यात हगणदारी मुक्त पहिला आदिवासी जिल्हा होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. आता नागरिकांचे आरोग्य ऊत्तम रहावे म्हणून स्वच्छ गाव, सुंदर गाव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने मोखाड्यातील खोडाळा ग्रामपंचायत पुढे सरसावली आहे. खोडाळा ग्रामपंचायत खासदार अरविंद सावंत यांनी सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतली आहे. त्यामुळे जिल्हयात या ग्रामपंचायतीच्या कारभारावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. 

खोडाळा ग्रामपंचायतीने गाव स्वच्छ रहावा यासाठी गावातील कचरा एका ठिकाणी गोळा करण्यासाठी कचराकुंड्या बांधल्या आहेत. तरी देखील गावात काही ठिकाणी कचरा रस्त्यावर टाकण्याचे व साठवल्याचे प्रकार ऊघडकीस आले आहे. त्यासाठी या घटनांना चाप बसावा म्हणून  2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेत रस्त्यावर कचरा टाकणे व साठवल्यास 200  दंड आकारण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. तसेच या घटनेची खबर देणाऱ्यास 100 रूपये बक्षीस देण्याचा निर्णय घेतला असून खबऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे.

दरम्यान, खोडाळा ग्रामपंचायतीचे दत्तक पालक खासदार अरविंद सावंत यांनी स्वच्छतेविषयी चांगला ऊपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील कचरा कुंडीतील ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे खत निर्माण करण्याची योजना आखली असल्याची माहिती खोडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, हे खत शेतकऱ्यांना विक्री करून ग्रामपंचायतीचा आर्थिक स्तर उंचावण्याची आमची संकल्पना असून त्यासाठीच खोडाळा ग्रामपंचायतीने कचऱ्याविषयी दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. 

Web Title: esakal news swachh bharat abhiyan news