घराघरांतील सावित्रीचा उत्सव!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

मुंबई : आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच ते शक्‍य झाले. शेण-दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिल्या. म्हणूनच आज प्रत्येक स्त्रीचा मार्ग प्रशस्त झाला. आजच्या काळात सावित्रीबाईंचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण होणे आवश्‍यक आहे. 3 जानेवारीला त्यांच्या जन्मदिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात सावित्री उत्सव साजरा करावा, अशी संकल्पना राष्ट्र सेवा दलाने पुढे आणली.

मुंबई : आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच ते शक्‍य झाले. शेण-दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिल्या. म्हणूनच आज प्रत्येक स्त्रीचा मार्ग प्रशस्त झाला. आजच्या काळात सावित्रीबाईंचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण होणे आवश्‍यक आहे. 3 जानेवारीला त्यांच्या जन्मदिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात सावित्री उत्सव साजरा करावा, अशी संकल्पना राष्ट्र सेवा दलाने पुढे आणली. त्या दिवशी दारात रांगोळी, घरात आकाश कंदील, दरवाजाला फुलांचे तोरण, उंबरठ्यावर विवेकाची पणती आणि कपाळावर सावित्रीबाई लावायच्या तशी चिरी (कुंकू) लावून सावित्री उत्सव प्रत्येक स्त्रीने साजरा करावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाने केले आहे. 

सावित्री उत्सव साजरा करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर स्त्रीने सावित्रीबाईंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. हा उपक्रम गेला आठवडाभर सुरू होता. त्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा झेलम परांजपे यांच्यापासून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आदींचा समावेश आहे. 
राष्ट्र सेवा दल आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची छबिलदास शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री उत्सव कार्यक्रम छबिलदास शाळेत संध्याकाळी 6.30 वाजता साजरा होणार आहे. या वेळी प्रसिद्ध नृत्यांगना आकांक्षा कदम यांचे नृत्य, नृत्यदिग्दर्शक सदानंद राणे यांनी दिग्दर्शित केलेले स्त्री जागर नृत्य, छबिलदास शाळेच्या विद्यार्थ्यांचे नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. लोकमान्य विद्या मंदिरचे विद्यार्थी नेचर क्‍लबच्या माध्यमातून शाळेबाहेरील नव्या प्रयोगाची ओळख उपस्थितांना करून देतील. 

मान्यवरांचा सहभाग 
आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला वाचा फोडणारी प्रतिमा शिंदे, माहुलवासीयांच्या नरकयातना समाजासमोर आणणारी अनिता ढोले आणि लग्नाच्या पहिल्या रात्री होणाऱ्या कौमार्य चाचणीच्या प्रथेविरुद्ध लढा देणारी प्रियांका तमायचीकर या सावित्रीच्या लेकींचा सन्मान होणार आहे. त्यांच्याशी संवादही साधला जाणार आहे. यंदाचा सावित्री संस्था पुरस्कार फटाकेविरहित दिवाळी साजरी करून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या लोअर परळच्या संयुक्त नवी चाळीला देण्यात येणार आहे. 

कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, अभिनेत्री चिन्मयी सुमित, अपना बॅंकेचे अध्यक्ष दत्ताराम चाफळे, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष शरद कदम, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. पारीख, छबिलदास हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार इनामदार, छबिलदास प्राथमिक शाळेचे अध्यक्ष अरविंद पार्सेकर, मुख्याधापिका गौतमी कांबळे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 

 

Web Title: event of rashtra seva dal for women on the birth anniversary of Savitribai Phule