'ईव्हीएम'च्या गोंधळाची सीबीआय चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

ठाणे - मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या गोंधळाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी ठाण्यातील शिवसेनेसह भाजपच्या उमेदवारांनी केली आहे. शिवसेनेसोबत भाजपच्या उमेदवारानेही थेट "सीबीआय' चौकशीची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ठाणे - मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या गोंधळाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी ठाण्यातील शिवसेनेसह भाजपच्या उमेदवारांनी केली आहे. शिवसेनेसोबत भाजपच्या उमेदवारानेही थेट "सीबीआय' चौकशीची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

महापालिका निवडणुकीत काही ठराविक ठिकाणी अपेक्षेपेक्षा फारच वेगळे निकाल लागले आहेत. अशावेळी या मतदानाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी या मतदानाची "सीबीआय' चौकशी करावी, अशी मागणी सर्वपक्षीय उमेदवारांनी केली आहे. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 10 आणि 11मधील सर्वपक्षीय पराभूत उमेदवार एकवटले असून, त्यांनी आयुक्तांशी याबाबत चर्चा केल्यानंतर थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या दोन्ही प्रभागांमध्ये शिवसेना, राष्ट्रावादी कॉंग्रेस, मनसे आणि भाजप उमेदवारानेही आक्षेप नोंदवला आहे. मतदान झाल्यानंतर 22 फेब्रुवारीला हॉली क्रॉस शाळेत "ईव्हीएम' ठेवण्यात आल्या होत्या. त्याचदिवशी रात्री 10.30 वाजता दोन संशयास्पद वाहनांनी "स्ट्रॉंग रूम'च्या आवारात प्रवेश केल्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांना दूरध्वनी करूनही त्या तब्बल चार तास उशिराने घटनास्थळी पोहचल्या होत्या. त्यामुळे तणाव निवळण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता.

मतमोजणीपूर्वी झालेल्या सर्व प्रकाराचे चित्रीकरण दाखवण्यात यावे, त्यानंतरच मतमोजणीला सुरवात करावी, अशी मागणी करूनही निवडणूक निर्णय अधिकारी पोवार यांनी चित्रीकरण न दाखवता मतमोजणीला सुरवात केल्याने त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. विशेष म्हणजे "स्ट्रॉंग रूम'मध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला आहे.

सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच आक्षेप घेतला असून, फेरनिवडणुकीची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली असून, याप्रकरणी न्यायालयात याचिकादाखल करण्यात येणार आहेत.

Web Title: evm machine cbi inquiry