माजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होत. 

मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होत. 

भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९६६ च्या तुकडीचे अधिकारी असलेले बोंगीरवार हे सचोटी आणि निर्णायक नेतृत्वगुणामुळे सर्वदूर परिचित होते. भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक तरुण अधिकाऱ्यांचे ते मार्गदर्शक होते. त्यापैकी अनेक जण सध्या राज्य प्रशासनात सचिव व अन्य महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पंचविसावे मुख्य सचिव म्हणून काम पाहताना राज्याच्या विकासात योगदान दिले. 

दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना मुख्य सचिव म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी यांचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

पुणे महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी त्यांच्या कार्यशैलीतील वेगळेपणाचा ठसा उमटवला.  पर्वती भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचा पहिला प्रकल्प राबविला. झोपडीधारकांना जागेवरून न हटवता त्यांचे केलेले पुनर्वसन हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी पाया घालून दिलेल्या या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रारूपाची आजही राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी केली जाते.

सुधाकरराव नाईक यांचे सचिव असताना मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सूक्ष्म जलसंधारण प्रकल्पांची सुरवात करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांनी उस्मानाबाद आणि नागपूर येथे सहा वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच औरंगाबाद, पुणे आणि कोकण येथे विभागीय आयुक्त म्हणूनही काम पाहिले. महसूल विभागातील त्यांच्या दीर्घ अनुभवाचे संचित म्हणून त्यांनी महसूल प्रशासनावरील बोंगीरवार समिती अहवाल सादर केला. या अहवालाची सरकारने नुकतीच अंमलबजावणी केली. 

ते मूळ विदर्भातील होते. त्यामुळे विदर्भातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी समयोचित आर्थिक तरतूद आणि विदर्भातील उद्योगांसाठी तेथील खनिज संसाधनांचा विकास करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला.

Web Title: Ex Chief Secretary Arun Bongirwar Passed Away