ठाण्यात नामवंत चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन 

ठाणे : प्रदर्शनात आकर्षक चित्रकृती न्याहाळताना रसिक (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : प्रदर्शनात आकर्षक चित्रकृती न्याहाळताना रसिक (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : रंगांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता जपणारे चित्रकार ठाण्यातील "स्वयम्‌' संस्थेच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अपंगांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या "स्वयम्‌' संस्थेला मदत मिळावी म्हणून महाराष्ट्रातील नामवंत चित्रकारांनी त्यांच्या चित्रकलाकृती "कलर्स फॉर लाईफ' अर्थात "रंगोत्सव जीवनासाठी' या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनात मांडल्या आहेत. ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांना एखादी कलाकृती आवडल्यास ती खरेदी करून "स्वयम्‌'ला आर्थिक साह्य करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन या कलाकारांनी केले आहे. 

ठाण्यातील "अनुभूती' आणि मुंबईच्या "आर्टदेश फाऊंडेशन'तर्फे माजिवडा येथील कलाभवनमध्ये हे चित्रकलाकृती प्रदर्शन भरविण्यात आले असून बुधवारी (ता. 4) सकाळी या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. 8 डिसेंबरपर्यंत सकाळी 10.30 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले रहाणार आहे.

राज्यभरातील सुमारे 30 नामवंत चित्रकारांनी साकारलेल्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. शारीरिक व्यंगावर मात करत खंबीरपणे आयुष्य जगणारे अपंग आणि त्यांना स्वबळाची शिकवण देणारी सामाजिक संस्था "स्वयम' यांच्या मदतीसाठी चित्रकारांनी आपल्या कलेचा वापर केला आहे. 

सुप्रसिद्ध चित्रकारांच्या दर्जेदार कलाकृती पाहण्यासाठी काही रसिकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती. स्वयमच्या संचालिका निता देवळालकर यांनी सांगितले की, स्वयम संस्था गेली 13 वर्षे अपंग विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सेवा देत आहे. वैद्यकीय उपचार आणि विशेष शिक्षणपद्धती देण्यासाठी संस्थेला कायम निधीची गरज असते.

हा निधी उभा करण्यासाठी संस्थेच्या वतीने चित्रकलाकृती प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनासाठी राज्यभरातील नामवंत चित्रकारांनी सहाय्य देऊ केले आहे. या प्रदर्शनात मांडण्यात आलेली कलाकृती रसिकांना आवडल्यास ते ती खरेदी करू शकतात. यातून जमा होणारा निधी हा अर्धा चित्रकारांना आणि अर्धा संस्थेला मदतीसाठी देण्यात येणार आहे. 

प्रदर्शनात मुलांचीही कलाकृती 
कलाकारांच्या या कलाकृतीसोबतच स्वयमच्या मुलांनी साकारलेली चित्रेही या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. बोटांचे ठसे, ब्रश यांनी साकारलेली कॅनव्हॉसवरील त्यांच्या कलाकृतीला चित्रकारांनी फिनिशिंग टच देऊ केला आहे. संस्थेच्या वतीने आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो, की या प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतीचा आनंद घ्या आणि कलाकृती मनापासून आवडली तर ती खरेदी करून आम्हाला मदत करा, असे निता देवळालकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com