राज्यात मतदानोत्तर चाचण्यांचा पुरता धुव्वा!

File Photo
File Photo

मुंबई : राज्यातील विधानसभेसाठीचे मतदान झाल्याबरोबर सर्वच वृत्तवाहिन्यांनी प्रचंड आरडाओरडा करीत सादर केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) निष्कर्ष वास्तवाच्या कसोटीवर पूर्णतः चुकले आहेत. जवळजवळ सर्वच वाहिन्यांनी राज्यात महायुतीला सरासरी २०० जागा मिळतील, असे भाकीत वर्तवून विजयाचा जल्लोष केला होता. प्रत्यक्षात महायुतीला केवळ १६१ जागांवरच समाधान मानावे लागले. अशा फुगलेल्या अंदाजांमुळे मतदानोत्तर चाचण्यांच्या एकूणच विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या आहेत.

भाजपचे गिरीश महाजन यांच्यासारखे नेते महायुतीला २१५ पर्यंत जागा मिळतील, असा दावा करीत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदानाच्या दिवशीच २५० चा आकडा जाहीर केला होता. खुद्द मुख्यमंत्रीही २२० जागा जिंकू, असा आत्मविश्वास व्यक्त करीत होते. विशेष म्हणजे टाइम्स नाऊ, एबीपी, सीएनएन न्यूज १८ यांसारख्या वाहिन्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष या दाव्यांशी तंतोतंत जुळत होते.

एबीपी-सीव्होटरने भाजपला १४०, तर सेनेला ७० जागा मिळतील आणि महाआघाडीतील काँग्रेसला ३१, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३२ जागांवर समाधान मानावे लागेल, असा दावा केला होता. टाइम्स नाऊने युतीला २३०, सीएनएन न्यूज १८ ने २४३ जागा देऊ केल्या होत्या. जन की बात (२२३) आणि पोल्स ऑफ पोल्स (२१३) या संस्थांनीही असेच अंदाज वर्तविले होते. टीव्ही ९ मराठीने युतीला १९७, झी-पोल डायरीने १७६-१९२, आज तक - अॅक्सिसने १६६-१९४ एवढ्या जागा मिळतील, असा निष्कर्ष काढला होता. 

यातील केवळ आज तक - अॅक्सिसने महाआघाडीला ७२ ते ९० असा काहिसा जवळ जाणारा अंदाज वर्तविला होता. टाइम्स-नाऊने मात्र आघाडीला पूर्णतः मोडीत काढून अवघ्या ४८ जागा मिळतील, असे सांगितले होते. प्रत्यक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मिळून ९८ जागा जिंकून आल्या आहेत. 

विशेष म्हणजे अशा प्रकारे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकूनही इंडिया टुडे ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक अरुण पुरी यांनी मात्र शुक्रवारी एका टिप्पणीद्वारे स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. हरियानात इंडिया टुडे- माय अॅक्सिसच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास आले आहेत.

महाराष्ट्रात मात्र त्यांनी महायुतीला १८१; तर महाआघाडीला ८१ जागा मिळतील, असे म्हटले होते. तो अंदाज सपशेल चुकला आहे. यामुळे या मतदानोत्तर चाचण्यांच्या प्रक्रियेबाबत समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर शंका व्यक्त करण्यात येत आहेत. 

एक्‍झिट पोल पाहून मला मुळीच चिंता वाटली नाही. कारण मला जमिनीवरचे वास्तव माहीत होते. त्यामुळे वेगळे चित्र दिसेल, याची खात्री होती. 
- शरद पवार, अध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस 
(एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com