'एक्‍स्प्रेस वे'चे उद्यापासून सर्वेक्षण

मंगेश सौंदाळकर
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई - बेशिस्त वाहनचालक व वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वेवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम प्रकल्प राबवला जाणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारपासून (ता. 7) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि राज्य महामार्ग पोलिस हे संयुक्त सर्वेक्षण करणार आहेत.

या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल दोन महिन्यांत सादर केला जाईल. त्यानंतर प्रकल्पाकरता तांत्रिक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. कॅमेऱ्यांसह कोणते तंत्रज्ञान वापरायचे हे ठरवले जाईल. नऊ ते 12 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

95 किलोमीटरच्या एक्‍स्प्रेस-वेवरील या प्रकल्पासाठी शनिवारी (ता. 4) पहिली बैठक झाली. त्यानुसार महामार्ग पोलिस आणि एमएसआरडीसी, आयआरबी, केपीएमजी हे 7 ते 15 ऑगस्ट या काळात संयुक्त सर्वेक्षण करणार आहेत. या मार्गावर अपघातप्रणव क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) किती आहेत याच्या प्रामुख्याने नोंदी होणार आहेत. वाहनांची गती आणि त्यामुळे होणारे अपघात यावरही तांत्रिक अभ्यास केला जाईल. सहा पदरी मार्गावर बस आणि अवजड वाहने शिस्तीचे पालन करत नाहीत. उलट दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरता कॅमेरे बसवले जाणार आहेत. हायस्पीड कॅमेऱ्यांमुळे चालकांना पुराव्यासह ई-चलन पाठवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.

एक्‍स्प्रेस-वे - 2006 ते 2016
- एक्‍स्प्रेस-वेवर पाच हजार 276 अपघात
- अपघातांत एक हजार 539 जणांचा मृत्यू
- बहुतांश अपघात अतिवेग आणि चालकांच्या क्षुल्लक चुकांमुळे

या प्रकल्पामुळे अपघात कमी होतील. वाहतूक कोंडीचे प्रकार कमी होणार आहेत. बेशिस्त चालकांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली जाईल.
- विजय पाटील, पोलिस उपायुक्त, महामार्ग पोलिस (मुख्यालय)

Web Title: express way survey